सामान्य रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा समजून काम करा – ना.मुनगंटीवार

0
21

चंद्रपूर जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयात सिटी स्कॅन मशिनचा लोकार्पण सोहळा
चंद्रपूर,दि.२५ :सामान्य रुग्णालयात येणा-या प्रत्येक सामान्य रुग्णाची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे, असे समजून रूग्णालयातील प्रत्येकाने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील प्रसुती पश्चात कक्ष तथा सिटी स्कॅन मशिनच्या लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तर प्रमुख अतिथी म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, नागपूर येथील आरोग्‍य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जायसवाल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एम. मुरंबीरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार उपस्थित होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 2 कोटी 20 लाख रुपये खर्च करुन सिटीस्कॅन मशिन खरेदी करण्यात आली आहे. या मशिनचा चंद्रपूर जिल्हयातील व चंद्रपूरच्या बाजूच्या जिल्हयातील नागरिकांना सुध्दा लाभ होणार आहे. तसेच 72 लाख 51 हजार रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या प्रसुती पश्‍चात कक्षामुळे प्रसुतीसाठी येणा-या महिलांना सुविधा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. सामान्‍य रूग्‍णालयात बर्न व जेनेरीक वार्ड च्‍या बांधकामासाठी 1 कोटी 1 लक्ष 49 हजार रू. निधी मंजूर करण्‍यात आला असुन जुलै 2017 पर्यंत या वार्ड चे काम पूर्ण होणार आहे. त्‍याच प्रमाणे 10 बेडच्‍या आय.सी.यु. च्‍या बांधकामासाठी व नेत्रचिकीत्‍सालच्‍या पहिल्‍या मजल्‍यावर 150 विद्यार्थी क्षमतेचे व्‍याख्‍यान कक्ष व गॅलरीच्‍या बांधकामासाठी 1 कोटी 12 लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. सदर रूग्‍णालयातील विविध इमारतींची दुरूस्‍ती व रंगरंगोटीच्‍या कामासाठी 8 कोटी 42 लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आल्‍याचे सांगत उत्‍तमोत्‍तम वैद्यकिय सेवा या रूग्‍णालयाच्‍या माध्‍यमातुन देण्‍यासाठी प्रत्‍येकाने तत्‍पर राहण्‍याचे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.चंद्रपूर येथे बसविण्यात आलेल्या सीटी स्कॅनमधील सामान्य गरीब रूग्णांना लाभ होईल, असे यावेळी बोलतांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले. चंद्रपूरसह गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील रूग्ण मशिनचा लाभ घेऊ शकतील. सदर मशिन अत्याधुनिक असून मशिनच्या तपासण्या महाग आहेत. या खर्चीक तपासण्या आता स्वस्त होतील, असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार नाना शामकुळे यांनी सुध्दा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एम. मुरंबीकर तर आभार डॉ. सोनारकर यांनी मानले. या कार्यक्रमास डॉक्टर, नगर सेवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.