अंदाज समिती २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी भंडारा जिल्ह्यात

0
16

भंडारा ,दि.२५ : राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या अंदाज समितीचा दौरा येत्या २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी जिल्ह्यात होणार आहे. समितीचे अध्यक्ष आणि राज्यातील विविध भागातील आमदारांचा या समितीत समावेश असतो. या दौऱ्यात कोणता मुद्दा अधिक चर्चिला येतो, याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.वर्षभरापूर्वी अंदाज समितीने आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पाचा आढावा घेतला होता. त्यानंतर या प्रकल्पाचे काम वेगाने पुढे सरकले असून हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. या अंदाज समितीत तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांचा समावेश आहे. त्यामुळे आता गोेसेखुर्द प्रकल्पाचा आढावा घेण्यात येत असल्यामुळे गोसेखुर्दच्या पुर्णत्वाची चिन्हे दिसू लागली, असे म्हणने अतिशयोक्तीचे ठरणार नाही.
गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला भेट दिल्यानंतर या समितीचे पदाधिकारी प्रकल्पाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेणार आहेत. यात प्रकल्पाच्या कामात झालेला गैरव्यवहार, भूसंपादनात अधिकाऱ्यांकडून होणारी दिरंगाई आणि प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या समितीचे पदाधिकारी जाणून घेणार आहेत. दुसऱ्या दिवशी महसुल विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि आरटीओ विभागाचा आढावा घेणार आहेत.
महसुल विभागाच्या आढाव्यात रेती चोरीचे प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे. भंडारा जिल्ह्यात ६० च्यावर रेती घाट आहेत. त्यापैकी काही रेती घाटांचे लिलाव झाले तर काही रेती घाटांचे लिलाव होऊ शकले नाही. परंतु सर्वच घाटातून रेतीचा बेसुमार उपसा सुरू आहे. सहा महिन्यापूर्वी रेती वाहतुकीदरम्यान, पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात नागपूर येथील एका ट्रकचालकाचा ट्रकमधून उडी घेताना मृत्यू झाला होता. मागील महिन्यात परिविक्षाधीन उपविभागीय अधिकाऱ्याने एका ट्रकचालकाला बेदम मारहाण केली होती. प्रकरण अंगलट येऊ नये, म्हणून दडपण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी आमदार परिणय फुके यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. मध्यंतरी तुमसर तालुक्यातील बामणी रेतीघाटावर आमदार चरण वाघमारे यांनी धाड घालून दोन पोकलँडसह दोन ट्रक पकडले होते.

त्यानंतर ही समिती उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेणार आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातून मागील पाच वर्षाच्या तुलनेत आता दारूची किती विक्री होत आहे. किती प्रकरणात कारवाई करण्यात आली. किती लिटर दारू जप्त करण्यात आली याचा आढावा घेणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा जिल्ह्यात अवैध वाहतुकीवर आरटीओ विभागाने किती आळा घातला. रेतीच्या जड वाहतुकीप्रकरणी किती जणांवर कारवाई केली. किती रूपयांचा महसुल शासनाला मिळाला, याचा आढावा घेण्यात येणार आहे.