शिवसेनेच्या जिल्हा बंदला तुमसर, साकोलीत प्रतिसाद

0
5

भंडारा दि.२: शेतीसाठी केवळ ८ तास वीज, वारेमाप वाढविलेले वीज बिल या मागणीला घेऊन शिवसेनेने पुकारलेल्या जिल्हा बंदला साकोली व तुमसर तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. उर्वरीत तालुक्यात मात्र अल्प प्रतिसाद लाभला. यावेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तुमसर येथे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात वीज बिलांची होळी केली.
बंदच्या माध्यमातून विद्युत विभागाला धारेवर धरण्यात आले. घरगुतीसह अन्य विद्युत बिलातही वीज कंपनीने भरमसाठ वाढ केली आहे. दुसरीकडे शेतीसाठी केवळ आठ तास विजेचा पुरवठा केला जात आहे. विदर्भातच वीजेचे उत्पादन होत असताना याची झळ आपल्यालाच सोसावी लागत आहे. विद्युत विभागाच्या या हिटलरशाहीचा या जिल्हा बंदद्वारे निषेध करण्यात आला.
जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा, साकोली, पवनी, लाखांदूर, लाखनी, अड्याळ, सानगडी, पालांदूर, जवाहरनगर हे काही प्रमाणात बंद राहिले. याप्रकरणी वीज विभागाने कारवाई न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने जनसांदोलन उभारेल, वेळप्रसंगी विदर्भ बंद आंदोलन करू असा खणखणीत इशाराही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख इंजि. राजेंद्र पटले यांनी दिला आहे. या बंद मध्ये विशेष बाब म्हणजे विद्यार्थांच्या परीक्षा सुरु असल्यामुळे शाळा, कॉलेज व त्यांना सेवा देणाऱ्या एस. टी. सह अन्य अत्यावश्यक सेवा सुरू होती. व्यपारी प्रतिष्ठाने बंद होती.
साकोली शहरात कडकडीत बंद ठेवण्यात येऊन मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना तहसिलदारांच्या मार्फत देण्यात आले. या बंदचे नेतृत्व माजी तालुका प्रमुख प्रकाश मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख संदीप वाकडे, ज्येष्ठ शिवसेना नेते किशोर चन्ने, सुरेश गजापुरे, दिलीप सिंगाडे, चंद्रकांत चोले, प्रणय कांबळे यांनी शहरात मोटरसायकल रॅली काढली. शेतकऱ्यांना १६ तास वीज पुरवठा दयावा, घरगुती, व्यापारी यांना वाढविलेल्या अतिरिक्त आकार बंद करण्यात यावा या दोन मागण्यांचासमावेश आहे. यावेळी संजय सोनवाने, जय मल्लानी, कार्तिक चौबे, जगदिश मनगटे, उमेश वरकडे, आशिष चेडगे, योगेश गजापुरे, सोनु धुर्वे, कैलास मोटघरे, सुनिल बोधनकर, जांबाज पठाण, उमेर खान, मनोज साखरे, राहुल धांडे, रवि पंधरे व शिवसैनिक उपस्थित होते.