berartimes.com
लाखांदूर दि.०3 मार्च: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी सहकार सुधार आघाडीला झालेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत प्राप्त झाले. यात १९ जागेपैकी १३ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे या पक्षातील अनेक संचालकांना सभापतिपदाचे डोहाळे लागल्याचे दिसून येत आहे. सभापती व उपसभापतिपदाची निवड ३ मार्च रोजी समितीच्या सभागृहात पार पडणार आहे.
दोन्ही पक्ष ताकदीने उभे असून सभापतिपदी कॉंग्रेस पक्षाचा संचालक निवडण्यात येणार आहे, त्यासाठी संचालक मंडळातील अनेक संचालक आपापले नशीब आजमावण्यासाठी प्रय▪करीत आहेत. त्यामुळे कोणाच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडते हे निवडीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र कॉंग्रेस पक्षाकडून सभापतिपदाच्या शर्यतीत सुभाष राऊत हे एकमेव दावेदार दिसत आहेत. सहकार क्षेत्रात त्यांनी सरांडी (बु.)गावातील सरपंच, पं. स. सदस्य, राईसमिल मासळचे उपाध्यक्ष व आता संचालक असा कार्यकाळ सांभाळला आहे.
पक्षश्रेष्ठींच्या निकालावर सभापतिपद अवलंबून आहे तर उपसभापतिपद हे राष्ट्रवादीकडे राहणार असल्याने त्यांच्याही गटात अनेक संचालकांत उत्सुकता दिसत आहे. मात्र नरेश दिवटे हे त्यांच्याकडून प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाचे प्रमुख दावेदार समोर आले आहेत, हे विशेष.




