नागपूर,दि.4 – झोटिंग समितीने माजीमंत्री एकनाथ खडसेंचा अर्ज फेटाळत चांगलाच धक्का दिला. दरम्यान, खडसेंच्या दुसर्या अर्जावर आता ६ मार्चला निर्णय होणार आहे.महसूलमंत्री असताना पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीची जागा आपल्या नातेवाईकांना पदाचा गैरवापर करून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या आरोपाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती डी. झोटिंग यांची समिती गठित करण्यात आली. समितीने आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून संबंधित अधिकार्यांची साक्षही नोंदविली. माजीमंत्री एकनाथ खडसेंनी आपली साक्ष समितीसक्षम दिली. पूर्वी व्यवहारचे सर्मथन करणार्या खडसेंनी व्यवहाराबाबत माहिती नसल्याची साक्ष समितीसमोर नोंदवित एकप्रकारे आपल्या भूमिकेपासून घूमजाव केला. खडसे यांनी समितीच्या कार्यकक्षेवर आक्षेप नोंदवित काही मुद्दे वगळून काही मुद्यांचा नव्याने समावेश करणार्या मागणीचा अर्ज सादर केला होता. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव आणि एमआयडीसीचे तत्कालीन सीईओ यांनाही चौकशीसाठी नव्याने बोलाविण्याचाही अर्ज दिला होता.
या अर्जावर दोन्ही पक्षांची सुनावणी समितीसमोर झाली. एमआयडीसीचे वकील चंद्रशेखर जलतारे यांनी यावर आक्षेप घेतला होता. दरम्यान,समितीचे अध्यक्ष झोटिंग यांनी राव आणि गगरानी यांना चौकशीसाठी नव्याने बोलाविण्याचा अर्ज फेटाळून लावला. हा खडसे यांना मोठा झटका मानला जात आहे. तर दुसर्या अर्जावर सोमवार ६ तारखेला निर्णय घेणार असल्याची माहिती एमआयडीसीचे वकील जलतारे यांनी दिली.





