पशुवैद्यकीय कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत

0
8

गोंदिया दि. 4 – जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे गेल्या चार महिन्यापासून वेतन झाले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली असून वरिष्ठांनी वेतनासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात पशुधन आहे. परंतु, त्या तुलनेत जनावरांवर उपचार करणारे पशुवैद्यकीय रुग्णालयांची संख्या कमी आहे. उपलब्ध पशुवैद्यकीय रूग्णालयातील रिक्त पदांची संख्या देखील गंभीर बाब आहे. असे असल्याने पशुपालकांना अनेकदा उपचाराअभावी आपल्या जनावरांवर औषधोपचार करता येत नाही. जेथे पशुवैद्यकीय रुग्णालय आहेत, तेथे तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने कर्मचार्‍यांनाच जनावरांवर उपचार करावे लागते. अशा विपरित परिस्थिती काम करणार्‍या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या जिल्ह्यातील कर्मचार्‍यांचे नोव्हेंबर २0१६ पासून वेतन झालेले नाही. याचा परिणाम त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहावर झाला असून कर्मचार्‍यांच्या कामकाजावर याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन तातडीने काढण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील पशुवैद्यकीय कर्मचार्‍यांनी केली आहे.