मेडिकल, मेयोचे डॉक्टर आजपासून संपावर

0
7

नागपूर,दि.20:धुळे येथे डॉ. रोहन मामोरकर यांना झालेली मारहाण व नाशिक येथेही डॉक्टरावर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मेडिकल व मेयोमधील शेकडो निवासी डॉक्टरांनी १७ मार्च रोजी संपाचा इशारा दिला होता. न्यायालयाच्या निर्देशांमुळे तो मागे घेण्यात आला. पण, उद्या सोमवारपासून होणारा संप ‘मार्ड’ संघटनेच्या ‘बॅनर’खाली नसून, निवासी डॉक्टर वैयक्तिकरित्या संपावर जाणार आहेत. तसे पत्रही त्यांनी मेडिकल व मेयो प्रशासनाला दिले आहे. डॉक्टरांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे मात्र प्रशासनाचा रक्तदाब वाढला असून, रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.सोमवारी(दि. २0) निवासी डॉक्टर सकाळी ८ वाजेपासून संपावर जाणार आहेत. डॉक्टरांनी घेतलेल्या अचानक निर्णयामुळे मेयो, मेडिकलचे प्रशासनाचा रक्तदाब वाढला असून, संपामुळे रुग्णसेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह नागपुरातील मेयो व मेडिकलमधील निवासी डॉक्टरांनी धुळे व नाशिकच्या घटनांना घेऊन शुक्रवार, १७ मार्च रोजी राज्यभरात निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने सुरक्षेच्या विषयावरून संप पुकारला होता. संपात मेयो, मेडिकलमधील ५00 च्यावर निवासी डॉक्टर सहभागी होणार होते. संप झाल्यास रुग्णसेवा विस्कळीत झाली असती. केवळ सुरक्षेच्या कारणावरून संप पुकारणे योग्य नसल्यामुळे यापूर्वीच एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने डॉक्टर व निवासी डॉक्टरांना संपावर जाता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले होते. केवळ सुरक्षेच्या कारणावरून कामावर अनुपस्थित राहून रुग्णांना वेठीस धरणे हे योग्य नसल्याचे बजावून न्यायालयाने संप केल्यास कडक कारवाईचा इशारा डॉक्टरांना दिला होता. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन न करता मार्डने संप मागे घेतला होता. मात्र, १0 दिवसांमध्ये डॉक्टरांवर हल्ल्याच्या तीन घटना झाल्या. अशा स्थितीत डॉक्टरांना काम करणे शक्य नाही. त्यामुळे हल्ले झालेल्या डॉक्टरांप्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी व डॉक्टरांना सुरक्षा मिळावी या विषयाला घेऊन उद्यापासून राज्यभरासह मेडिकल, मेयोचे डॉक्टर ‘मार्ड’ संघटना म्हणून संपावर जाणार नसून, वैयक्तिकरित्या बेमुदत संपावर जाण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.