वैयक्तिक लाभाच्या योजनांवर भर द्या-नाना पटोले

0
12

भंडारा दि.20: गरीब व सामान्य माणसाच्या विकासाच्या अनेक योजना केंद्र व राज्य सरकार राबवत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु केल्या आहेत. यात वैयक्तिक लाभाच्या अनेक योजनांचा समावेश आहे. अशा सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सुचना खासदार नाना पटोले यांनी दिल्या.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृह घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. अहिरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर व अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यावेळी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी मिळणारा निधी व त्यासाठीची अंमलबजावणी आदिचा आढावा घेण्यासाठी ही समिती गठित करण्यात आल्याचे सांगून पटोले म्हणाले की, भंडारा जिल्हयात आरोग्य, शिक्षण व रोजगार या क्षेत्रात भरीव कार्य करण्याची गरज आहे. येत्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करण्यात याव्यात. चौदाव्या वित्त आयोगातून यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नाविण्यपूर्ण योजनेतून ५० शाळा डिजिटल करण्यासाठी निधी देण्यात आला आहे.
मानव विकास मिशनमधुन आणखी ५० शाळांसाठी निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. खासगी शाळांमध्ये गरीबांच्या मुलांना २५ टक्के प्रवेश राखून ठेवण्याचे शासनाचे निर्देश आहेत याची अंलबजावणी शिक्षण विभागांनी करावी आणि ज्या शाळा यांचे पालन करणार नाहीत त्या शाळा व्यवस्थापनावर कारवाई करावी असे ते म्हणाले.
स्वच्छ भारत मिशन अभियान स्वरुपात राबवावे, शहर व गावांचे घनकचरा व्यवस्थापन योग्य करावे, जिल्हयाचे कृषी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हावे, डिजिटल इंडिया योजनेत शासकीय कर्यालय पेपरलेस करावी अशा सुचना त्यांनी केल्या. भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असुन पाण्याच्या योग्य नियोजनाबरोबरच सर्व विभागांनी पाणी अडविण्याचा आपापला आराखडा तयार करावा असे निर्देश त्यांनी दिले.साकोली-लाखनी साठी असलेली पाणी पुरवठा योजना पुढील आठवड्यात कार्यान्वित करण्याच्या सुचना त्यांनी सबंधित विभागाला दिल्या.
राष्ट्रीय पाणलोट योजनेमध्ये वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. गरिबांचे कल्याण या योजनेच्या माध्यमातून साधता येते. पाणलोट अंतर्गत जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना राबवाव्यात. आपण विविध तालुक्यात जनता दरबार घेतले आहेत. जनता दरबारात प्राप्त झालेली सर्व निवेदन त्या त्या विभागाला पाठविण्यात आली असुन त्यावर तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश खासदारांनी दिले. पाणलोट योजनेचा कृषी विभागाने गाव खेड्यात प्रसार -प्रचार करावा असे त्यांनी सांगीतले.
गरीब कुटुंबातील महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्तता करण्यासाठी प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु करण्यात आली असुन या योजनेतून एकही कुटुंब सूटता कामा नये असे त्यांनी सांगितले. पिक विम्याबाबत अनेक तक्रारी असुन विमा कंपनीची बैठक घेण्यात येऊन त्यांना आढावा घ्यावा, अशा सुचना त्यांनी केल्या.सर्व खाते प्रमुख व कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकारी या सभेला उपस्थित होते.