विद्यार्थिनींच्या दुचाकी जाळणारा विद्यार्थी निष्कासित

0
14

नागपूर ,दि.01: मेडिकलच्या वसतिगृह क्रमांक दोनमधील विद्यार्थिनींच्या दुचाकी जाळणारा मेडिकल महाविद्यालयाचा ‘एमबीबीएस’ द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने या विद्यार्थ्याला एक वर्षासाठी निष्कासित करण्यासोबत, परीक्षेला बसू न देण्याचा कारवाईचा निर्णय घेतला आहे. हा विद्यार्थी लुधियाना येथील रहिवासी असून, अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अधिष्ठाता कार्यालयाजवळच असलेल्या मुलींच्या वसतिगृह क्रमांक दोनमध्ये १३ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास दोन दुचाकी पेटविण्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. दुचाकी जाळणारा आरोपी ‘सीसीटीव्ही’मध्ये कैद झाला. गाड्या जाळणारा कुणी बाहेरची व्यक्ती नव्हे तर तो मेडिकलच्या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे समोर आले. मेडिकल प्रशासनाने याप्रकरणी डॉ. नितीन पाटील, डॉ. राऊत यांच्यासह चार सदस्यांची चौकशी समिती नेमली. या समितीने चौकशी करून अहवाल तयार केला आहे. हा अहवाल अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. चौकशीत हा विद्यार्थी ‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याचे ‘स्पष्ट झाले. अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी या विद्यार्थ्याला मेडिकल परिसरात, वसतिगृहात प्रवेश राहणार नाही. एक वर्षासाठी महाविद्यालयाची दारे बंद असणार आहे. परीक्षेलाही बसता येणार नाही. स्वत:च्या कृत्यामुळे या विद्यार्थ्याचे एक वर्षाचे नुकसान होणार आहे. मंगळवारी या कारवाईचे आदेश निघणार आहे. विद्यार्थ्यावर झालेल्या या कारवाईमुळे इतर विद्यार्थ्यांवर मात्र चांगलाच वचक बसला आहे.विशेष म्हणजे, पोलिसांचीही चौकशी अंतिम टप्प्यात आली असून त्यांच्याकडून काय कारवाई होते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.