उष्माघातापासून बचावाबाबत व्यापक जनजागृती करा-जिल्हाधिकारी दिवसे

0
7

भंडारा,दि.04 : उन्हाची तिव्रता व उष्माघात विदभार्ला नवीन नसला तरी अलिकडच्या काळात उष्माघाताने होणार्‍या मृत्युच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षात देशात व राज्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून उन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जनजागृती आवश्यक झाली आहे. या प्रशिक्षणातून प्रशिक्षण घेवून सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी जनमाणसात उन्हाचे परिणाम व त्यापासून बचाव याबाबत जागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आहे.
येत्या शैक्षणिक क्षेत्रापासून जिल्हयातील प्रतयेक शाळेत प्रार्थनेनंतर काही वेळ उष्माघात, जलजन्य आजार व स्वच्छता याबाबत विद्यार्थ्यांमध्ये वर्षभर जागृती मोहिम राबविण्यात येईल. यासाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग यांच्यामधून मास्टर ट्रेनर तयार केले जातील व त्यांच्या मार्फत ही मोहिम राबविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद सभागृहात उष्माघात कृती योजना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, आयएमए चे अध्यक्ष डॉ. बावणकर, डॉ. गिर्‍हेपुंजे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद््घाटन जिल्हाधिकारी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. उष्माघात व आपत्ती बाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यभरात मोठया प्रमाणात जागृती केली आहे. रस्त्यावरील अपघाताखालोखाल उष्माघाताने मरणार्‍या व्यक्तींची संख्या आहे. उष्माघातापासून बचाव करणे ही संपूर्णत: व्यक्तीगत खबरदारीची बाब आहे. तरी सुध्दा जागृती करणे आवश्यक असून प्रशिक्षण घेणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांनी योग्य प्रकारे जागृती केल्यास आपण अनेकांचे जीव वाचवू शकु, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
उष्माघात व आपत्तीपूर्वी स्वयंस्फूर्तपणे खबरदारी ही संस्कृती निर्माण करणे आवश्यक आहे. असे क ल्चर आपण सर्व मिळून करु या, असे ते म्हणाले. येत्या शैक्षणिक क्षेत्रापासून प्रत्येक शाळेत आठवडयातून 2 दिवस प्रार्थनेनंतर पिण्याचे स्वच्छ पाणी, जलजन्य आजार व उष्माघात याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यात येईल. हे विद्यार्थी आपल्या कुटूंबात व अवती-भोवतीच्या समाजाला प्रबोधन करतील यासाठी प्रत्येक विभागातून पाच कर्मचार्‍यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
उष्माघात कृती योजना कार्यशाळेत प्रशिक्षणार्थींना उष्माघातापासून बचावाबाबत शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या ठिकाणी शिकलेल्या बाबी प्रशासनाचे दुत म्हणून आपण समाजापयर्ंत पोहचवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज सुर्यवंशी यांनी केले.जिल्हा सामान्य रुग्णालयातील उष्माघातापासून बचावाबाबत तयार करण्यात आलेल्या घडी पुस्तिका वितरित करण्यात आल्या. उष्माघात व त्यापासून बचाव या विषयीची सादरीकरणही करण्यात आले. विषयतज्ञांनी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस विविध विभागाचे अधिकारी , कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.