आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने बालकाचा मूत्यू

0
10

आल्लापली,दि.04-तालुक्यातील गोविंदगाव येथील एका महिलेने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात कमी वजनाच्या बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेला बाळ सुदृढ असल्याचे सांगून सुट्टी देण्यात आली. आरोग्य विभागाने त्या बाळावर योग्य उपचार करणे आवश्यक असताना देखील आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने सदर महिलेचा बाळ दगावल्याची घटना काल ३ मे रोजी घडली. त्यामुळे पालकांकडून आरोग्य विभागावर रोष व्यक्त केला जात आहे.
गोविंदगाव येथील सुमित्रा गंगाधर कोठारी या महिलेला प्रसुतीसाठी ३० एप्रिल रोजी रात्री १ वाजता जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. त्यानंतर सुमित्राला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी त्याच दिवशी रात्री २ वाजताच्या सुमारास हलविले. १ मे रोजी सुमित्राने २.२५० किग्रॅ. वजनाच्या गोंडस मुलीला जन्म दिला.त्यानंतर डॉक्टरांनी सदर मातेची व नवजात मुलीची आरोग्य तपासणी न करता एका दिवसाच्या कालावधीनंतर म्हणजे ३ मे रोजी सुट्टी दिली. त्यामुळे सुमित्रा आपल्या नवजात मुलीला घेऊन गोविंदगाव येथे आली. मात्र, घरी आल्याच्या अर्ध्या तासानंतर मुलगी दगावली. आरोग्य अधिकाऱ्यांनी बाळाची योग्य तपासणी न करताच रुग्णालयातून सुट्टी दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.