गोंदिया नगरपालिकेची तहकूब आमसभा आज

0
10

गोंदिया,दि.9 : आमसभेतील विषयांचे टिपण ऐनवेळी आदल्या दिवशी देण्यात आल्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षातील सदस्यांनी नगर परिषदेच्या पहिल्याच आमसभेत विरोध दर्शवित कामकाज होऊ दिले नाही. परिणामी सोमवारला (दि.८) आयोजित आमसभा तहकूब करण्यात आली व आता ही आमसभा आज मंगळवारी (दि.९) घेतली जाणार आहे.सात महिन्यानंतर ही आमसभा होत असून या आमसभेत शहरातील अतिक्रमणावर काय भूमिका घेतलीजाते त्याकडेही लक्ष लागले आहे.

माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांनी १० सप्टेंबर रोजी शेवटची आमसभा घेतली होती. त्यानंतर आता नवा कार्यकाळ सुरू झाला असून विद्यमान नगराध्यक्ष अशोक इंगळे यांची ही पहिलीच आमसभा होती. ७१ विषयांना घेऊन बोलाविण्यात आलेल्या आमसभेतील विषयांची टिपणी काही नगरसेवकांना आमसभेच्या एका दिवसापूर्वी रविवारी मिळाली. ७१ विषयांचा अभ्यास करण्याचा वेळही सदस्यांना मिळाला नाही. यामुळे कॉंग्रेसचे नगरसेवक सुनील भालेराव, शकील मंसूरी, शिवसेनेचे राजकुमार कुथे, बहुजन समाज पक्षाचे पंकज यादव, कल्लू यादव यांनी विरोध केला. तसेच काही विषय सदस्यांच्या न विचारता घेण्यात आल्यानेही सदस्यांनी आपली नाराजगी दर्शवित कामकाज होऊ दिले नाही.

यावेळी सत्तापक्षातील काही सदस्य व पदाधिकाऱ्यांनी कामकाज होऊ देण्याबाबत म्हटले. मात्र विरोधी पक्षातील सदस्यांनी पूरजोर पणे आपला विरोध मांडत कामकाज सुरू होऊ दिले नसल्याची माहिती आहे. परिणामी सोमवारची (दि.८) आमसभा तहकूब करावी लागली. विशेष म्हणजे, आमसभेसाठी तयार करण्यात आलेल्या विषयसूचीतील विषयांना घेऊनही काही सदस्यांनी आपली नाराजगी व्यक्त केली.