दानवेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेचे आंदोलन

0
13

वाशीम/ यवतमाळ,दि.11- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल काढलेल्या असभ्य वक्तव्याचे पडसाद आज (गुरुवार) वाशीम  /यवतमाळ जिल्ह्यात उमटले.शिवसेनेच्या वतीने वाशीम येथील कृषीउत्पन्न बाजार समितीसमोर दानवेंच्या प्रतिकात्मक पूतळ्याला जोडे मारून भाजप विरोधी घोषणा देण्यात आल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूर खरेदीबाबत असभ्य वक्तव्य केले होते. तर यवतमाळ येथे शेतकऱ्यांबद्दल असभ्य भाषा वापरणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ कापून आणणाऱ्याला यवतमाळ जिल्हा शिवसेनेचे प्रमुख संतोष ढवले यांच्याकडून दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

दानवेंच्या विधानावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधे संताप व्यक्त होत असताना जिल्हा शिवसेनेच्या वतीने गुरूवारी सकाळी येथील बाजार समितीसमोर शेकडो शिवसैनिक गोळा झाले. दानवे व भाजपच्या विरोधात घोषणा देत दानवेंच्या प्रतिकात्मक पूतळ्याला जोडे मारून रोष व्यक्त केला. हे आंदोलन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमूख माणिक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाले. कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, रिसोड येथेही शिवसेनेने जोडे मारो आंदोलन करून दानवेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

यवतमाळ – शेतकऱ्यांबद्दल असभ्य भाषा वापरणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जीभ कापून आणणाऱ्याला यवतमाळ जिल्हा शिवसेनेचे प्रमुख संतोष ढवले यांच्याकडून दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. इतिहासात सगळ्यात जास्त तूर आपल्या सरकारने खरेदी केली, अजून एक लाख टन तूर खरेदी करणार आहे तरी रडतात साले, अशी असभ्य भाषा रावसाहबे दानवे यांनी वापरली होती. यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, विरोधी पक्षांकडून दानवेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. आता भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच यवतमाळमध्ये दानवेंविरोधात आंदोलन केले.असभ्य भाषा वापरून शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्या दानवे यांचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. दानवेसाहेब सत्तेची मस्ती डोक्यात जाऊ देऊ नका. ही सत्ता शेतकऱ्यांनीच तुम्हाला दिली आहे आणि त्यांनाच ‘साले’ अशी शिवीगाळ तुम्ही करता? तुमचा हा माज शेतकरी येत्या निवडणुकीत नक्कीच उतरवतील, असे वक्तव्य शिवसेना नेत्यांनी केले. दानवे यांच्या फोटोची गाढवावरून पालकमंत्री मदन येरावार यांच्या निवासस्थानापर्यंत धिंड काढण्यात आली.