आमदारकीनंतर फुके पहिल्यांदाच पोचले नागरिकामध्ये,साधला सवांद

0
7
तिरोडा,दि.19 : तालुक्यातील चावडी वाचन, डासमुक्त गाव, गाळमुक्त धरण, गाळयुक्त तलाव पाहणीकरिता बुधवार,(दि.१७)आमदार विजय रहांगडाले, विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे यांनी मेंढा येथील रोजगार हमी योजनेवरील मजुरांशी संवाद साधला. विशेष म्हणजे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आमदार फुके हे पहिल्यांदाच जनतेमध्ये या माध्यमातून गेले आहेत.यापुर्वी त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष अशा विकास कामावर सवांद साधलेला नव्हता.त्यातही गोंदिया जिल्ह्यातील मिडीयापासून मात्र त्यांनी आजही आपली लांबी बनवून ठेवली आहे.ते कुठपर्यंत गोंदियाच्या मिडियाशी दूर राहतात याकडेही लक्ष लागले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे यांनी विविध विकासकामे शोषखड्डे जलसंधारणाच्या कामाची पाहणी दरम्यान नवेझरी येथे चावडी वाचन, शोषखड्डे पाहणी दरम्यान विष्णुदास उके, महेंद्र भांडारकर व गावकर्‍यांच्या उपस्थितीत जलसंधारणाचा एक भाग म्हणून सांडपाण्याचे शुद्धीकरण करून पुनर्वापर करण्याकरिता नवीन पद्धतीने तयार करण्यात येत असलेल्या शोष खड्डय़ाचा जादुई शोषखड्डा असा उल्लेख करून या खड्डय़ांमुळे अनेक गावे डासमुक्त झाली असून हा अभिनव प्रयोग आपल्या जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात राबविण्याची गरज असल्याचे सांगितले. यानंतर आ. रहांगडालेसोबत बेरडीपार येथील मामा तलावाचे गाळ उपसा व खोलीकरण कामाची पाहणी करून मेंढा येथील नाला सरळीकरण रोहयोच्या कामाच्या पाहणीदरम्यान कामावरील ३१९ महिला-पुरुष कामगारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून त्वरित दूर करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. या संपूर्ण पाहणी दरम्यान आमदार व जिल्हाधिकार्‍यांसह उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार संजय रामटेके, खंडविकास अधिकारी एच. एस. मानकर, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, उपअभियंता जगताप, संबंधित गावाचे सरपंच, उपस्थित होते.