मोदी, फडणवीस सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी-डॉ.नामदेव उसेंडी

0
7

गडचिरोली, दि.२६: केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार नवे काहीच करीत नसून, काँग्रेसने केलेल्या कामांचेच भूमिपूजन व उद्घाटन करीत आहे. दोन्ही सरकारांनी बेरोजगारी व महागाई वाढविली असून, ही सरकारे सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, नगरसेवक सतीश विधाते, महासचिव प्रभाकर वासेकर, समशेरखान पठाण, पुरुषोत्तम मसराम, काशिनाथ भडके, सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष नंदू वाईलकर, सुभाष धाईत, युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव महेंद्र ब्राम्हणवाडे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनिकांत मोटघरे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नीतेश राठोड, लहूजी रामटेके, रामदास टिपले, अपर्णा खेवले, आशा मेश्राम उपस्थित होते.

डॉ. उसेंडी म्हणाले, भाजप सरकारने ३ वर्षांत ३० थापा मारल्या. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी पाकिस्तानवर आगपाखड करीत होते. एक सिर के बदले १० सिर काटेंगे, अशी भाषा करीत होते. आता मात्र भारतीय सैनिक मोठ्या प्रमाणावर शहीद होत असताना मोदी सरकार काहीच करीत नाही. निवडणुकीपूर्वी आधार कार्डवर टीका करणारे मोदी आता सर्व योजनांसाठी आधार कार्डचाच आधार घेत आहेत. ज्या जीएसटीला भाजपने विरोध केला होता, तेच विधेयक आज भाजपने आणून महागाई वाढविली आहे, अशी टीका डॉ.उसेंडी यांनी केली.

दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ, शेतमालाला दीडपट हमीभाव देऊ, अशा वल्गना करणारे भाजपवाले आता कुठे गेले, असा सवाल करुन काँग्रेसच्या काळात कमी दरात मिळणारी डाळ, पेट्रोल, डिझेल व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असताना कर्जमाफी केली जात नाही, उलट शेतकऱ्यांच्या जमिनी अल्पकिमतीत उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. दलित, अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत असून, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मागील तीन वर्षांपासून मिळाली नाही. नोटबंदीमुळे काळा पैसा येईल, दहशतवाद, नक्षलवाद मिटेल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात तसे झालेच नाही, असेही डॉ.उसेंडी म्हणाले.