धावत्या रेल्वेत अडकून वृद्ध महिला जखमी

0
9

वडसा,दि.२६: गोंदिया-बल्लारशहा पॅसेंजरमधून उतरत असताना तोल जाऊन रेल्वेत अडकल्याने एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास अरुणनगर रेल्वेस्थानकावर घडली. वच्छला विश्वनाथ बडोले(७३)रा.बारव्हा, ता.लाखांदूर असे जखमी महिलेचे नाव आहे.

वच्छला बडोले ह्या आज गोंदिया-बल्लारशहा पॅसेंजरमध्ये बसून प्रवास करीत होत्या. अरुणनगर येथील रेल्वेस्थानक जवळ येताच गाडीचा वेग कमी झाला. प्रवासी उतरण्यासाठी दरवाजाजवळ गर्दी करु लागले. वच्छला बडोले ह्यादेखील उतरण्यासाठी दरवाजाजवळ आल्या. मात्र, गाडी संथगतीने सुरु असतानाच तोल गेल्याने गाडीखाली येऊन त्यांचा डावा पाय कटला. घटनेनंतर सौ.बडोले यांना रेल्वे पोलिसांच्या मदतीने वडसा रेल्वेस्थानकावर आणण्यात आले. देसाईगंजचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी वाहतूक पोलिस अशोक मिर्धा, रामकिशन कोमरा, सिद्धू बाबर यांच्यासह रेल्वेस्थानक गाठून वच्छला बडोले यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. सौ. बडोले यांच्यासोबत त्यांचे वृद्ध पती विश्वनाथ बडोले हेदेखील होते. दोघांकडे रेल्वे प्रवास तिकिट असल्याने रेल्वे विभागाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पूरेपूर मदत करण्यात येईल, असे व्यवस्थापक पी एस भोंडे यांनी सांगितले.