शॉर्पशुटरची दोन पथके दाखल

0
10

आरमोरी दि.२९:  आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील रवी, कोंढाळा परिसरात दबा धरून बसलेल्या नरभक्षक वाघाने आतापर्यंत दोन बळी घेतले. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याचे आदेश वनमंत्री व प्रधानसचिव (वने) यांनी शुक्रवारी दिल्यानंतर वाघाला पकडण्याची शोधमोहीम युध्दपातळीवर सुरू झाली आहे. ताडोबा येथून शॉर्पशुटरची दोन पथके आरमोरीत दाखल झाली आहेत.शॉर्पशुटर व वनकर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने रवी, कोंढाळा, मुल्लूर चक व उसेगाव परिसराच्या विविध ठिकाणी नरभक्षक वाघाला शोधण्यासाठी सर्चिंग आॅपरेशन सुरू केले आहे. लवकरच ‘तो’ नरभक्षक वाघ जेरबंद होईल, असा आशावाद वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी तोडाबा येथून शॉर्पशुटरची १० जणांची टीम आरमोरीत दाखल झाली आहे. या टीममध्ये वन परिक्षेत्राधिकारी चिडे यांच्यासह शॉर्पशुटर अजय मराठे, डॉ. खोब्रागडे यांचा समावेश आहे. याशिवाय वनाधिकारी व वनकर्मचारी यांचे ३० ते ४० जणांचे पथक नरभक्षक वाघाची शोध मोहीम राबवित आहेत. या शोधमोहिमेत वडसा वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक कांबळे, चौडींकर, आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर, वडसाचे वन परिक्षेत्राधिकारी चांदेवार हे सुध्दा सहभागी झाले आहेत.

आरमोरी व वडसा वन परिक्षेत्रातील रवी, कोंढाळा, मुलूर चक व उसेगाव परिसरात गेल्या एक ते दीड महिन्यापासून पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला आहे. या भागातील जंगल परिसरात रानडुकराचे प्रमाण, पाणी, नदी, नाले, हिरवळ व वाघाला आवश्यक असणारे आश्रयस्थान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाघाचा वावर या भागात वाढला आहे. सदर नरभक्षक वाघाने आजपर्यंत दोन इसमावर हल्ला करून त्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व प्रधान वन सचिव विकास खारगे तसेच वरिष्ठ वनाधिकारी गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले असता, वाघाला जेरबंद करण्याची मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी रेटून धरली. त्यानंतर वनमंत्र्यानी २६ मे रोजी सदर नरभक्षक वाघाला तत्काळ जेरबंद करण्याचे आदेश वनाधिकाऱ्यांना दिले. लागलीच शॉर्पशुटरच्या दोन टीम आरमोरीत दाखल झाल्या. वन विभागाने १०-१० वन कर्मचाऱ्यांच्या पाच टीम तयार केल्या आहेत. उपवनसंरक्षक विवेक होशींग यांच्या मार्गदर्शनात आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांच्या नेतृत्वात शॉर्पशुटर व वनकर्मचाऱ्यांचे विविध ठिकाणी सर्चिंग आॅपरेशन सुरू झाले आहे. वाघाला जेरबंद करण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू झाली आहे.