गडचिरोली जिल्ह्यात वीज कोसळून चार जण ठार, सात जखमी

0
15

गडचिरोली/ मुलचेरा, दि.१०: वीज कोसळून चार जण ठार, तर सात जण जखमी झाल्याची घटना काल(दि.९) रात्री पावणे सात वाजताच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील  धन्नूर येथे घडली. शामराव मुनी कन्नाके(५८), संदीप शिवराम कुसनाके(३०), रितेश शामराव कन्नाके (२५) व जाणिकराम लालू तोडसाम(४३) अशी मृतांची नावे असून, लचमा मंगा कन्नाके रा.रेंगेवाही, दीपक तुळशीराम कुसनाके, लक्ष्मण सोमा तोरे, विलास मारोती आत्राम, दिवाकर गिरमा तलांडे, रमेश मुरलीधर कुसनाके व आकाश विलास कुसनाके हे जखमी झाले आहेत. जखमींना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

धन्नूर येथे काल शामराव मुन्नी कन्नाके यांच्याकडे जय पेरसापेन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कन्नाके यांचे नातेवाईक व काही निमंत्रित या कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर संध्याकाळी सर्वांनी भोजन केले. एवढयात वातावरणात अचानक बदल होऊन मेघगर्जनेसह पावसास सुरुवात झाली. यामुळे काही जणांनी धन्नूर व धन्नूर टोला गावाच्या मध्यभागी असलेल्या एका झाडाखाली आश्रय घेतला. मात्र, काही क्षणातच त्याच झाडावर वीज कोसळल्याने ४ जण जागीच ठार झाले, तर ७ गंभीर जखमी झाले.

शामराव मुनी कन्नाके हे पोलिस विभागात कार्यरत असून, दोन महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते अशी माहिती असून, तेही या दुर्घटनेत ठार झाले. संदीप शिवराम कुसनाके(३०) यांचा आष्टी येथील रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला. दरम्यान उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

दुसरी घटना चामोर्शी तालुक्यातील वाकडी येथे घडली. काल संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वाकडी येथे वीज पडून ३ जण गंभीर झाले. अनिल मारोती कोहपरे(२८), विद्या अनिल कोहपरे(२५) व रुखमाबाई गणपती फाळके(५०) अशी जखमींची नावे आहेत. हे तिघेही जण शेतात काम करीत असताना वीज कोसळल्याने ते जखमी झाले. जखमी अवस्थेतच ते शेतात पडून होते. शेजारच्या शेतात काम करीत असलेले दिलिप नवघडे यांनी आपल्या भावाच्या मदतीने त्यांना चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य कविता भगत व सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भगत यांनी भेट घेऊन जखमींची विचारपूस करून योग्य उपचार करण्याची सूचना केली.