तहसीलदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-भाजप

0
5

पवनी,दि.29 : मांगली जोडरस्ता बोरगाव गावाजवळ २२ जून रोजी मांगली चौ. येथील प्राची मोतीलाल मांडवकर हिला भरधाव वेगाने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने चिरडले ती जागीच गतप्राण झाली. तहसलिदार पवनी यांचे रेतीघाटावरून अवैध उत्खनन व ओव्हरलोड वाहतूक यावर अजिबात नियंत्रण नाही. त्यामुळे रेती तस्कर व त्यांच्या ट्रक-टिप्परचे चालक राजरोसपणे अवैध व ओव्हरलोड रेती वाहतूक करीत आहेत.याप्रकरणी दोषी असलेल्या तहसलिदाराला जबाबदार धरून त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष हरिश तलमले यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला माजी जि.प. सभापती हंसा खोब्रागडे, भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे, जिल्हा पदाधिकारी राजेंद्र फुलबांधे, अमोल तलवारे, मयुर रेवलकर, गुलाब सिंधीया व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भंडारा यांना पाठविलेल्या निवेदनात अपघात प्रकरणी मांगली येथील निरपराध नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे व दोषी असलेल्या तहसिलदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. पवनी व लाखांदूर तालुक्यातील रेतीघाटावरून रेतीची अवैध तस्करी होत आहेत.ओव्हरलोड रेती वाहतूक करीत असल्याने भरधाव वेगाने रात्रंदिवस ट्रक व टिप्पर चालत आहेत. वर्षभरात ओव्हरलोड वाहतुकीने २० पेक्षा अधिक लोकांचे बळी घेतलेले आहेत व कित्येक हात पाय गमावून बसलेले आहेत. मात्र प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. बोरगाव येथील अपघाताने परिसरातील नागरिक रस्त्यावर आले व त्यांनी आंदोलन केले. आंदोलनादरम्यान झालेल्या नुकसानीस मांगली येथील काही नागरिकांना दोषी धरून त्यांचेवर गुन्हे दाखल केले जात आहेत.