लेखाधिकाऱ्यांची स्वेच्छानिवृत्तीची मागणी

0
5

गोंदिया,दि.09: नगर परिषदेत लेखाधिकारी व लेखा परीक्षक पदावर रूजू झाल्यानंतर वैद्यकीय रजेवर गेलेल्या लेखाधिकाऱ्यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज देऊन टाकला आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या लेखा विभागाचा कारभार प्रभारावरच चालणार आहे.नगर विकास प्रशासनाने अवघ्या राज्यातच स्थानांतरणाची मोहीम राबवीली. यात गोंदिया नगर परिषदेतील राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बाहेर स्थानांतरण करण्यात आले. कर्मचारी गेले तेवढे कर्मचारी नगर परिषदेत रूजू झाले नाहीत. मात्र रूजू झालेले कर्मचारी सुट्या टाकून आता पळ काढू लागले असल्याचे प्रकार दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणाने नगर परिषदेतील महत्वपूर्ण विभाग रिकामे झाले आहेत.
अशातच नगर परिषदेच्या लेखा विभागातील लेखाधिकारी प्रदीप अग्निहोत्री यांचे स्थानांतरण झाले. अगोदरच लेखापरिक्षकांचे पद रिकामे होते. त्यामुळे अग्निहोत्री यांच्या जागेवर आलेले सुधाकर काळे यांना लेखाधिकारी व लेखापरिक्षक अशी नियुक्ती देण्यात आली.२ जून रोजी काळे येथे रूजू झाले.मात्र ७ जून पासून ते वैद्यकीय रजेवर गेले होते. ४ जुलै रोजी काळे नगर परिषदेत आले व यावेळी त्यांनी थेट स्वेच्छानिवृत्तीचाच अर्ज दिला असल्याची माहिती आहे. नरखेड येथून स्थानांतरण होऊन काळे येथे आले होते.
रोखपाल दुबे यांच्याकडे सध्या लेखापरिक्षक व लिपीक जयप्रकाश भेंडारकर यांच्याकडे लेखाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आल्याची माहिती आहे.