Home विदर्भ जि.प.मध्ये तिप्पट दराने खरेदी

जि.प.मध्ये तिप्पट दराने खरेदी

0

गडचिरोली : १३ वने व ७ टक्के वनमहसूल अनुदानांतर्गत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पुरवठा करण्याचे काम नियमबाह्यपणे ई- निविदा प्रक्रिया राबवून जिल्हा परिषद प्रशासनाने पाच पुरवठादारांना दिले आहे.
सदर पुरवठादार बाजार भावापेक्षा तिप्पट दराने जिल्हा परिषदेला शैक्षणिक साहित्य पुरवठा करण्याच्या तयारीत लागले आहेत. मागील पाच-सहा वर्षांपासून याच पुरवठादारांवर जिल्हा परिषद प्रशासन मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. बाजार भावापेक्षा जादा दराने या साहित्याची खरेदी जि. प. करीत असल्याने जिल्हा परिषदेलाही प्रचंड आर्थिक फटका यात बसत आहे. मात्र अधिकार्‍यांशी पुरवठादारांची मिलीभगत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यास प्रचंड टाळाटाळ मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून केली जात असल्याचा आरोप निविदा नाकारण्यात आलेल्या कंत्राटदारांनी केला आहे.
अहेरी येथील सिद्धीविनायक ट्रेडर्सला स्कूल बॅग पुरवठय़ाचे काम देण्यात आले आहे. बालाजी बायडिंग वर्क्‍स नागपूर यांना शिक्षक हजेरी व चेक रजिस्टर, बी. के. ट्रेडर्स नागपूरला नोटबुक व ड्राईंग वही पुरवठय़ाचे काम देण्यात आले आहे. तर शिव प्रिन्टर्स गडचिरोलीला स्टेशनरीचे पाच साहित्य पुरविण्याचे सर्वात मोठे काम देण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी संचयी नोंदपत्रक, विद्यार्थी संचयी फाईल, आकस्मिक मूल्यमापन वर्तनात्मक नोंदवही, सातत्यपूर्व सर्वमूल्यमापन पुस्तिका, प्रकल्प व कार्यलेखन पुस्तिका, तसेच संतोष एंटरप्राईजेसला रंगकांडी व बॉटल बॉक्स पुरवठय़ाचे काम देण्यात आले आहे. हा पुरवठा १५ लाखापर्यंत केला जाणार आहे. जी स्कूलबॅग बाजारात १२0 ते १२५ रूपयाला मिळते ती बॅग हे पुरवठादार जिल्हा परिषदेला २२५ रूपयात तर ३८ ते ४0 रूपयाला बाजारात असलेली शिक्षक हजेरी व चेक रजिस्टर ५३ रूपयाला पुरवठा केली जाणार आहे. तसेच १४ रूपयाला मिळणारे नोटबुक २७ रूपयाला तर १८ रूपयाला मिळणारी ड्राईंगवही ४५.५0 रूपयाला पुरवठा केली जाणार आहे. विद्यार्थी संचयी नोंद पत्रक हे ८ ते १0 रूपयाला असताना त्याची किंमत पुरवठादाराने ३५ रूपये दाखविली आहे. विद्यार्थी संचयी फाईल जी ७ ते ८ रूपयाला बाजारात मिळते ती २५ रूपयाला जिल्हा परिषदेला पुरवठा केली जाणार आहे. याशिवाय आकस्मिक मूल्यमापन वर्तनात्मक नोंदवही ३0 रूपयाला बाजारात उपलब्ध आहे. ती ९५ रूपये दराने जिल्हा परिषदेला दिली जाणार आहे. तसेच सातत्यूपूर्व सर्वमूल्यमापन पुस्तिका ३0 ते ३५ रूपयाची मिळत असताना ९५ रूपये दराने जिल्हा परिषद याचीही खरेदी याच पुरवठादाराकडून करीत आहे. प्रकल्प व कार्यलेख पुस्तिका ५ रूपयाला बाजारात मिळते. ती २५ रूपयाला पुरवठा करण्यात येत आहे. रंगकांडी १0 रूपयाला तर बॉटलबॉक्स २५ रूपयाला मिळत असतांना पुरवठादार अनुक्रमे २0 व ४५.७५ रूपयाला हे साहित्य जिल्हा परिषदेला पुरविणार आहे.
विशेष

Exit mobile version