परिचर चालवितो आरोग्य उपकेंद्र

0
12

सावली -तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेले विहीरगाव येथील उपकेंद्र एका परिचराच्या भरोशावर चालविले जात आहे. त्यामुळे येथे रुग्णसेवेचा फज्जा उडालाआहे.
शासनाची आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने या परिसरातील नागरिकांना पैसेखर्च करून खासगी वैद्यकीय सेवा घ्यावी लागत आहे. विहीरगाव उपकेंद्रात केवळ एक डॉक्टर आहे. या एकाच डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाचही उपकेंद्रासह अंतरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परिणामी विहीरगाव येथील उपकेंद्र वार्‍यावर सोडुन उंटावरून शेळ्या हाकण्याची प्रकार आरोग्य विभाग करित आहे. याचा परिणाम परिसरातील रुग्णांना भोगावा लागत आहे. शासकीय आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याने परिसरात खासगी वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉक्टरांचे फावत आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य कंद्राच्या मापदंड व निकषाप्रमाणे विहीरगाव उपकेंद्रात मोडणार्‍या एकूण तीन गावातील ४0 हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र व त्यामध्ये एक डॉक्टर नियुक्ती करण्यात आली. परंतु परिसरातील लोकसंख्येचा तुलनेत प्रभावी व गुणवत्तापुर्ण आरोग्यसेवा मिळणे, अपेक्षित असताना उपकेंद्रातील परिचर, एक आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका (एन.आर.एम.एम.), एम.बी.डब्ल्यू. वर्कर, व एक मदतनीस यांच्याच भरवशावर डॉक्टराविना दवाखाना सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे येथील रुग्णसेवा विस्कळीत झाली असून नागरिकांना मनस्ताप होत आहे.