सरपंचाने मोठी रक्कम घेऊन दिले तेंदूचे कंत्राट-गावकऱ्यांचा आरोप

0
14

कुरखेडा, दि.११: तालुक्यातील पलसगड येथील सरपंचाने तेंदूपत्ता ठेकेदाराकडून परस्पर १ लाख ९० हजार रुपये घेऊन त्यास स्वस्त दरात कंत्राट दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून, १२ सप्टेंबरला ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत दादाजी कसारे, ईश्वर मेश्राम व रवींद्र पुराम यांनी तेंदूपत्ता कंत्राटदाराकडून सरपंच उमाजी धुर्वे यांनी १ लाख ९० हजार रुपये परस्पर घेऊन स्वस्त दरात कंत्राट देऊन भ्रष्टाचार केला व त्यामुळे ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असा आरोप केला. या आरोपांची शहानिशा करण्यासाठी थेट ग्रामसभेतूनच विश्वनाथ तुलावी यांच्या मोबाईलचे स्पिकर ऑन करून तेंदूपत्ता कंपनीचे मॅनेजर पारधी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सरपंच धुर्वे यांना रक्कम दिल्याचे कबूल केले व गरज पडल्यास कोणत्याही कोर्टात कबुली देण्यास तयार असल्याचे सांगितले .यावेळी ग्रामसभेनी सरपंचास विचारणा केली असता सरपंच उमाजी धुर्वे यांनी रक्कम घेतल्याची कबुली दिली. मात्र ग्रामसभेकडून रकमेची मागणी होताच सरपंच धुर्वे हे ग्रामसदस्याना दमदाटी करू लागले. यामुळे संतप्त ग्रामवासीयांनी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे टोकण्याचा इशारा संबंधितां पाठविलेल्यां निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे पलसगडवासीयांचे लक्ष लागले आहे.