वडेट्टीवारांनी आत्मचिंतन करावे

0
12

चंद्रपूर : पक्षबांधणीसाठी आणि पक्षवाढीसाठी आजवर ज्यांनी परिश्रम घेतले त्यांच्या कार्याबद्दल अपमानजनक बोलून कार्यकर्त्यांची मने दुखावण्यापेक्षा आमदार विजय वडेट्टीवार यांनी स्वत:च्या भूतकाळाचे आत्मचिंतन करावे, असा उपरोधिक सल्ला नगरसेवक अशोक नागापुरे यांनी एका पत्रकातून दिला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे चंद्रपुरात आले असता काँग्रेस सेवादल भवनातील सभागृहात त्यांची सभा झाली. सभेत त्यांच्यासह स्थानिक नेत्यांची भाषणे झाली होती. यात विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेल्या मुद्यांचा अशोक नागापुरे यांनी प्रसिद्धीपत्रकातून समाचार घेतला. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपणास पक्षाकडून तिकीट मिळणे अपेक्षित असतानाही ेतिकीट डावलण्यात आले. यासाठी वडेट्टीवार हेच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. आपली भूमिका स्पष्ट होती.
पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याने महापौरपदाच्या निवडणुकीत आपण पक्षनिरीक्षक नितीन राऊत यांच्या आग्रहानुसार काँग्रेसच्या बाजूने भाग घेतला. भाजपाशी हातमिळवणी करणार्‍या नगरसेवकांना पक्षात सन्मान मिळाला. महिला काँंग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही आमदार वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसारच देण्यात आले. शिवसेनेत असणार्‍या प्रकाश देवतळे यांना अध्यक्षपद देण्यातही त्यांचाच पुढाकार होता, असाही आरोप त्यांनी केला आहे. पक्ष मोठा केला त्यांना डावलण्याची भूमिका सोडावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.