डेंगीमूळे गेला वानाडोगंरीतील शिक्षकाच्या मुलाचा बळी

0
13

नागपूर,दि.21- हिंगणा तालुक्‍यातील  वानाडोंगरी नगर  परिषद परिसरातील वैभवनगर, महाजनवाडी येथे डेंगी या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे. परिसरातील पाच ते सहा रुग्ण या आजारातून उपचारानंतर कसेबसे बरे झाले. मात्र कोकाटे ले-आउट परिसरात राहणाऱ्या चहांदे या शिक्षक दाम्पत्याच्या अकरावीत शिकणाऱ्या तन्मयचा मंगळवारी (दि.१९) डेंगी आजाराने मृत्यू झाला. त्याची बहीण गेल्या दहा दिवसांपासून आजारी आहे.

महाजनवाडी येथील कोकाटे ले-आउट परिसरात वसंता चहांदे दोन वर्षांपासून राहायला आले. ते कळमेश्‍वर तालुक्‍यातील सुसुंद्री येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. त्यांच्या पत्नी  अनिता चहांदे या त्याच तालुक्‍यातील नांदीखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना तन्मय व डिंपल अशी दोन अपत्ये आहेत. डिंपल ही आठ ते दहा दिवसांपासून डेंगी या आजाराने त्रस्त असून तिच्यावर नागपूरला उपचार सुरू आहेत. सोमवारी तन्मयची अचानक प्रकृती बिघडल्याने परिसरातील दवाखान्यात उपचार करून औषध घेतले. लगेच दुसऱ्या दिवशी त्याची तब्बेत जास्त झाल्याने लता मंगेशकर रुग्णालयात हलविले. परंतु, उपचारापूर्वीच काळाने तन्मयला हिरावून नेले. मुलीच्या तब्येतीकडे लक्ष देत असतानाच मुलाकडे दुर्लक्ष झाले. त्यात वडिलांचे निवड श्रेणीचे प्रशिक्षण सुरू होते.

रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या नीलडोह उपचार केंद्रातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्यसेविका भारती माडेकर व त्यांच्या दोन्ही मुलांना डेंगी झाला. माडेकर या एका खासगी रुग्णालयात आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. त्यांचा मुलगा अंकुश हा अमेय हॉस्पिटलमध्ये भरती आहे. वानाडोंगरी नगर परिषद झाली. परंतु, राबविणारी यंत्रणा नसल्याने परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.