धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कचा कोनशिला समारंभ आज

0
10

नागपूर,दि.२७ : मिहान-सेझमध्ये जमीन खरेदी केल्यानंतर अनिल धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वातील धीरूभाई अंबानी एरोस्पेस पार्कचा कोनशिला समारंभ तब्बल दोन वर्षांनंतर आज शुक्रवार, २७ आॅक्टोबरला दुपारी ४.१५ वाजता होणार आहे.
या समारंभात फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स परळे, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, फ्रान्सचे राजदूत अ‍ॅलेक्झेंडर जिग्गलर, फ्रान्सच्या डॅसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रापियर आणि रिलायन्स समूहाचे चेअरमन अनिल अंबानी उपस्थित राहतील.
भारत सरकारने फ्रान्सच्या डॅस्कॉल्ट एव्हिएशनपासून सुमारे ६० हजार कोटी रुपयांचे ३६ राफेल फायटर जेट ही लढाऊ विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. करारानुसार फ्रेंच पुरवठादार भारतात ३० हजार कोटी रुपयांचे विमानाचे सुट भाग बनविणार आहे.
अटीची पूर्तता करण्यासाठी, डॅसॉल्टने रिलायन्स एडीएजी ग्रुपसह डेसॉल्ट रिलायन्स एव्हिएशन लिमिटेड (डीएआरएल) या नावाने संयुक्त कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीत रिलायन्स एडीएजीचा ५१ टक्के आणि डॅसॉल्टचा ४९ टक्के वाटा आहे. डॅसॉल्ट या प्रकल्पात १०० दशलक्ष युरो अर्थात ७६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ती आतापर्यंत कोणत्याही संरक्षण उत्पादनातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
सुरुवातीला डीआरएएल मिहान-सेझमध्ये राफेल जेटसाठी सुट्या भागांची जोडणी आणि त्यानंतर उत्पादन युनिट सुरू करणार आहे. २०१८ च्या एप्रिल-जून या तिमाहीत उत्पादन होण्याची शक्यता आहे.