कृषी केंद्र तीन दिवस बंद ठेवण्याचा इशारा

0
14

भंडारा,दि.31 : चुकीच्या पद्धतीने कीटकनाशक औषधी फवारणी केल्याने विषबाधा झाल्यामुळे शेतकरी व शेतमजुरांचे दुर्दैवी मृत्यू परजिल्ह्यात झाले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत संघटना दुखी आहे. मात्र या प्रकरणी केवळ कृषी निविष्ठा विक्रेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यामुळे केंद्र सुरू ठेवणे कठीण झाले आहे.
कृषी केंद्र व्यवसायिकांना न्याय देण्यात यावा, अन्यथा २ नोव्हेंबरपासून तीन दिवस कृषी केंद्र बंद ठेवण्यात येईल, असा इशारा अ‍ॅग्रोडीलर असोसिएशन शाखा भंडाराच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू किंवा बाधित झालेले शेतकरी व शेतमजुरांविषयी संघटना गंभीर आहे. मात्र यात कृषी निविष्ठा विक्रेतेच दोषी असल्याचे ठरविले जात आहेत. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले ते मागे घेण्यात यावे, निलंबित परवाने पुर्ववत देण्यात यावे, परवान्यामध्ये कीटकनाशकाचे उगम प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी मुदत देण्यात यावी, संगणकीय पद्धतीने ठेवण्यात आलेला साठा रजिस्टर ग्राह्य धरण्यात यावे आदींचा निवेदनात समावेश आहे. शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष मोरेश्वर बोरकर, उपाध्यक्ष हिरालाल खोब्रागडे, सचिव सुनिल पारधी आदींचा समावेश होता.