गोंदिया,गोरेगाव व तिरोडा तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर

0
17

८ प्रकारच्या सवलती लागू
गोंदिया,दि.२ : यंदा जून ते सप्टेबर या कालावधीतील पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांमुळे सन २०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव हे तालुके प्रभावित झाल्याने या तालुक्यात आपत्तीची शक्यता विचारात घेत राज्य शासनाने या तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.
जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे या तालुक्यांना ८ प्रकारच्या सवलती लागू करण्याला शासनाने मंजूरी दिली आहे. यामध्ये जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषि पंपाच्या चालू विजबिलात ३३.५ टक्के सुट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतीचा समावेश करण्यात आला आहे.

पीक कापणी प्रयोग शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
जिल्ह्यात भात पीक हे मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असून या पिकाकरीता १२०० मि.मी. पावसाची आवश्यकता असते. खरीप हंगाम २०१७ मध्ये सरासरीच्या केवळ ५३ टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम २०१७ मध्ये जिल्ह्यातील एकूण ५७ हजार १७५ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी महसूल मंडळ हा घटक ग्राह्य धरला जातो. प्रत्येक महसूल मंडळनिहाय उत्पादकतेची आकडेवारी निश्चित करण्याकरीता जिल्ह्यात ३०० पीक कापणी प्रयोग आयोजित करण्यात आले आहे. पीक कापणी प्रयोगाकरीता गावस्तरीय समितीचे सर्व सदस्य, कृषि विस्तार अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील व कृषि सहायक यांनी पीक कापणी व मळणीच्यावेळी उपस्थित राहून पीक कापणी प्रयोगामध्ये प्राप्त उत्पन्नाची नोंद घ्यावी. तसेच पीक कापणीचे मोबाईल ॲप्सवर क्षेत्रीय कर्मचारी माहिती भरतील याची दक्षता घ्यावी. असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी कळविले आहे.