हमीभावाने सोयाबीनची खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा-भागवत देवसरकर

0
11

नांदेड दि. 2 -शेतकऱ्यांची शेतमालाची खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असून हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालांची व सोयाबीनची खरेदी करणाऱ्या व्यापारी व मिलधारकांविरोधात तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक आले असून ते विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे. परंतु व्यापाऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करताना शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने सर्वच व्यापारी शेतमालाची खरेदी करत आहेत. शासनाच्या एफएक्यूनुसार शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करावा हा कायदा असतानाही सर्रासपणे व्यापारी व मिलधारक याचे उल्लंघन करीत आहेत. याबाबतची सर्व माहिती भ्रमणध्वनीवरून जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांना भागवत देवसरकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. हा सर्व प्रकार गंभीर असून व्यापाऱ्यांनी व मिल मालकांनी शेतकऱ्यांचा माल हमीभावानेच खरेदी करावा, अन्यथा या व्यापारी व मिल मालकांविरोधात फौजदारी कार्यवाही करणार, असा इशारा फडणीस यांनी दिला. मुळात छोटे-मोठे व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करून मिलला विक्री करत असतात. नांदेड जिल्ह्यातील सर्वच मिल धारकांनी शासनाच्या हमीभावापेक्षा सोयाबीन खरेदीचे दर कमी ठेवल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट होत आहे. संबंधित व्यापारी व मिलधारकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत व शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भागवत देवसरकर यांनी दिला आहे.
यावेळी प्रदेश सहसचिव संदीप पावडे, महानगराध्यक्ष परमेश्वर काळे, दीपक पवार, दीपक देशमुख, सतीश पाटील जाधव, सुनील ताकतोडे, अविनाश ताकतोडे, संदीप वानखेडे यांची उपस्थिती होती.