नवरगावच्या सरपंच व सचिवाचे ग्रामसभेतून पलायन

0
19

सिंदेवाही- पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ जानेवारीला आयोजित ग्रामसभा गोंधळातच पार पडली. अखेर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्याला ग्रामसभेतून पलायन करावे लागले.

२६ जानेवारीला सर्वत्र विशेष ग्रामसभा आयोजित केल्या होत्या. त्याचप्रमाणे नवरगाव ग्रामपंचायतीमध्येसुद्धा ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला गावातील १३४ नागरिक उपस्थित होते. यावेळी ग्रामसभा आयोजित करण्याच्या स्थळावरुनच वाद सुरू झाला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रजासत्ताक दिनी बसस्थानकावर ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली. मात्र आतापर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर ग्रामसभा न घेतल्याने नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत सभागृहातच ग्रामसभा घेण्याचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ठरविले.

याच मुद्यावरून वादाला तोंड फुटले. शेवटी संपूर्ण ग्रामसभा गोंधळात पार पडली. मागील सभेचे इत्तीवृत्त वाचून दाखवावे, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली. परंतु ही विशेष ग्रामसभा असल्याने व ते विषयपत्रिकेवर नसल्याने इतिवृत्त वाचून दाखविता येणार नाही, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे वाद वाढतच गेला. शेवटी आभार मानून ग्रामसभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर सरपंच व ग्रामविकास अधिकारी सभागृहातून बाहेर पडले. गोंधळ सुरुच असताना ही बाब संपूर्ण गावभर पसरली. सरपंच व ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी ग्रामसभेतून पलायन केल्याची वार्ता गावभर पसरली. याबाबत ग्रामविकास अधिकारी बी.सी. शंभरकर यांना विचारणा केली असता, चौकात ग्रामसभा घेणे त्रासदायक ठरते. मागील सभेचा वृत्तांत ही विशेष ग्रामसभा असल्याने पुढील ग्रामसभेत वाचून दाखविला जाईल. सभेतून कुणीही पलायन केले नाही गोंधळ सुरू झाल्याने कार्यालयात येऊन बसल्याचे त्यांनी सांगितले