कंत्राटी एएनएमचे साखळी उपोषण सुरूच

0
14

गोंदिया,दि.08 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्तच्या नावे ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले होते. दरम्यान रिक्त जागांनुसार त्यांचे समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होत; मात्र आता तीन वर्षांचा काळ लोटूनही आरोग्य विभागाने त्या कंत्राटी एएनएम यांना कामावर घेतले नाही.या अन्यायाविरूद्ध कंत्राटी बेरोजगार एएनएम अनेकदा जिल्हा परिषदेत पायपीट केली. मात्र यश न आल्याने त्यांनी सोमवारपासून (दि.४) जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
त्यांच्या उपोषणाला कास्ट्राईब कर्मचारी संघटना व शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. आता तरी जिल्हा परिषद प्रशासन न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील तीन वर्षांपासून कामावर रूजू होण्याच्या प्रतीक्षेत ४० हून अधिक बेरोजगार कंत्राटी एएनएम सातत्याने जिल्हा परिषदेच्या चकरा मारत होत्या. दरम्यान त्यांनी जि.प. चे पदाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र मागील तीन वर्षांपासून त्यांच्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे कंटाळून त्यांनी माजी आमदार दिलीप बनसोड, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे डॉ. माधवराव कोटांगले, माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांच्या मार्गदर्शनात जि.प. कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये रंजिता सार्वे, डॉली पालांदूरकर, शीला ठाकरे, शेफाली श्यामकुवर, वर्षा खोब्रागडे, कल्पना बन्सोड, ललिता भोंगाडे, योगेश्वरी सव्वालाखे, माधुरी खेळकर, नीता ढवळे, ममता तितिरमारे, रूपाकुमारी चौधरी, भाग्यश्री झिंगरे, शोभा ठाकरे, प्राची वानखेडे यांचा समावेश आहे.