24.1 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह

वेकोलिने अडविला इरई नदीचा प्रवाह

0
29

चंद्रपूर,दि.14 : कोळशाचे अधिक उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या वेकोलिचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरची जीवनदायिनी असलेल्या इरई नदीचा प्रवाहच वेकोलिने अडवून धरल्याचे उघडकीस आले आहे. चंद्रपुरातून इरई आणि झरपट या दोन नद्या वाहतात. झरपट नदी पूर्वी या चांदागडची जीवदायिनी होती तर आता इरई नदी चंद्रपूरकरांची तहान भागवित आहे. असे असताना इरई नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले आहे. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी नदी पात्रातच बसून आंदोलन केले आहे. अनेक सामाजिक संघटनांनी आवाज बुलंद केल्यामुळे अखेर शासनाला याबाबत गंभीर व्हावे लागले. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. काही प्रमाणात इरई नदीचे खोलीकरण व रुंदीकरण झाले आहे. अजूनही हे काम अपूर्णच आहे. अशातच इरई धरण- ताडोबा व्याघ्र प्रकल्प या जोडरस्त्याच्या बाजुने भटाळी गावाकडे जाणाऱ्या सिमेंट रपट्याच्या काही अंतरावर केवळ दोन पाईप टाकून इरई नदीच्या पात्रातच मातीचा रपटा बनविला आहे. यामुळे इरई नदीचे नैसर्गिक पात्र व पाण्याचा प्रवाह अडला आहे. या रपट्यावरून वेकोलिचीवाहने मार्गक्रमण करीत आहेत. वास्तविक, कुठल्याही नदी वा तिच्या प्रवाहासोबत अशी छेडछाड करता येत नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासन, सिंचन विभाग आदींची परवानगी घ्यावी लागते.