विदर्भातील डेंग्यू प्रभावित जिल्ह्यात विशेष बाब म्हणून निदान प्रयोगशाळा सुरू करणार- डॉ. दीपक सावंत

0
11

नागपूर दि: 18 : राज्यात डेंग्यू निदानासाठी 38 प्रयोगशाळा कार्यरत आहेत.त्यापैकी विदर्भात 10 प्रयोगशाळा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली येथे आहेत. ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येथील तेथे विशेष बाब म्हणून डेंग्यू निदान प्रयोगशाळा सुरू करण्यात येतील. राज्यात नोव्हेंबर अखेर 38,574 व्यक्तींना स्वाईन प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली.  आमदार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात नोव्हेंबर अखेर डेंग्यूचे 6894 रुग्ण आढळून आले आहेत. विदर्भात ऑगस्ट ते ऑक्टोंबर या काळात 234 रुग्ण आढळले, मात्र डेंग्यूमुळे रुग्ण दगावल्याची नोंद नाही. विदर्भ हा किटकजन्य आजारासाठी अतिसंवेदशील असल्याने या भागात प्रतिबंधात्मक उपाययोजना गांभीर्याने राबविल्या जात आहेत.
यावेळी झालेल्या चर्चेत एका उपप्रश्नाला उत्तर देतांना आरोग्य मंत्री म्हणाले की, स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी ऑसेल्टॅमीवीर हे औषध नागपूर येथील मेडिकल कॉलेज व अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून सर्व औषधी दुकानातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. संपूर्ण विदर्भ हा किटकजन्य आजारासाठी अतिसंवेदनशील असल्याने या विभागामध्ये किटकजन्य आजार व प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत गांभीर्यपूर्वक राबविल्या जातात. यामध्ये आरोग्य विभागाचे कोणतेही दुर्लक्ष झाले नाही.
डेंग्यू, मलेरिया सारख्या किटकजन्य आजारावर नियंत्रणासाठी किटकजन्य सर्वेक्षण केले जात आहेत. स्वाईन फ्लू निदानासाठी विदर्भात दोन शासकीय व एक खाजगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया,चंद्रपूर जिल्हे मलेरियासाठी संवेदनशील आहेत. त्यामुळे विदर्भातील 11 जिल्ह्यापैंकी 9 जिल्ह्यात किटकनाशक फवारणी करण्यात येते. आतापर्यंत राज्यात हिवताप नियंत्रणासाठी 6 लाख 56 हजार 710 मच्छरदाण्यांचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी 5 लाख 7 हजार 669 मच्छरदाण्या विदर्भात
वाटण्यात आल्या आहेत.
गडचिरोली हा राज्यातील सर्वाधिक मलेरिया प्रवण जिल्हा असून या जिल्ह्याकरिता विशेष कार्य योजना आखली आहे. मागील तीन वर्षात या जिल्ह्यातील मलेरिया रुग्णात लक्षणीय घट झाली आहे. लेप्टो प्रभावित भागात अति जोखमीच्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक उपचार देण्यात येतो.यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री डॉ. मिलींद माने, अशोक पाटील,अमीन पटेल, श्रीमती यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला.