गोरेगावात प्रमाणित ले-आऊटच्या रस्त्यावर अतिक्रमण

0
9
सारजा लॉन परिसरातील प्रकार
जिल्हाधिकारी, न.पं.व तालुका प्रशासनाकडे तक्रार
गोरेगाव,दि.27 : नगर व गाव विकास आराखडा लक्षात घेवून भूखंड ले-आऊट परवानगी दिली जाते. मात्र, भूमाफिया शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्राहकांची दिशाभूल करीत रस्ते व बगीच्याचे जमीन गळप करीत आहेत. हा प्रकार गोरेगाव येथील सारजा लॉनच्या मागील भूखंड ले-आऊटमध्ये सुरू आहे. सारजा लॉनच्या विस्ताराखाली भूखंडावर मालकी हक्क दाखवून रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. या प्रकरणाची तक्रार तहसीलदार, नगरपंचायत, पोलिस स्टेशन व जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.
१० वर्षांपूर्वी एस.के. बिल्डर्सकडून सारजा लॉन स्थित भूखंड ले-आऊट आखण्यात आले. शासनाच्या निकषातंर्गत ले-आऊट प्रमाणित करण्यात आले. मात्र, आता सारजा लॉन विस्ताराचे बांधकाम सुरू करण्यात आले. लॉन मागील सर्व भूखंड आपल्या मालकीचे आहेत. हे हक्क दाखवून ले-आऊटमधील २०-२० फूटांचे दोन रस्त्यावर अतिक्रमण केले. दरम्यान, एक रस्त्यावरील अतिक्रमणला घेवून परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतले असता धमकी देवून बळजबरीने बांधकाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याप्रकरणी एक महिन्यापूर्वी ‘आपले सरकार’ या पोर्टलवर तक्रार करण्यात आली होती. याची दखल घेवून तहसीलदार डहाट यांनी रस्ता मोकळा ठेवण्याचे निर्देश दिले. परंतु, तहसीलदाराच्या आदेशाला केराची टोपली दाखवून पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण पवित्रा घेतला आहे. एवढेच नव्हे तर तक्रारकर्त्यांना धमकीसुध्दा दिली जात आहे. याबाबत पोलिस स्टेशन, तहसीलदार, न.प.प्रशासनाकडे पुन्हा तक्रार करण्यात आली आहे. यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण थांबविण्यासाठी प्रशासनस्तरावर कोणते पाऊल उचलण्यात येणार याकडे लक्ष लागले आहे.
..
न.पं. व महसूल प्रशासनाची बघ्याची भूमिका
गोरेगाव येथे अनेक प्रमाणित ले-आऊट आहेत. परंतु, भू-माफिया सर्रासपणे ले-आऊट मधील रस्ते व बगीच्याची जमीन गळप करीत आहे. तर नगरपंचायत प्रशासन बघ्याची भूमिका बजावत आहे. विशेष म्हणजे, सारजा लॉन ले-आऊट संदर्भातील अतिक्रमणाची तक्रारही करण्यात आली. तरी न.पं.कडून अद्यापही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. यामुळे निंद्रावस्थेचा सोंग का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.