जयराम ठाकूर यांनी घेतली हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

0
5

सिमला,दि.27(वृत्तसंस्था) – गुजरातमध्ये काल मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर आज हिमाचल प्रदेशमध्ये जयराम ठाकूर यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळयाला उपस्थित आहेत. रिज शिमला येथे सुरु असलेला हा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. महेंद्र सिंह, किशन कपूर आणि सुरेश भारद्वाज यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. अनिल शर्मा, सरवीन चौधरी आणि राम लाल मारकंडा यांनी सुध्दा मंत्रिपदाची शपथ घेतली. विरेंद्र कनवर, विक्रम सिंह यांनी सुद्धा शपथ घेतली.

यांनी घेतली शपथ
जयराम ठाकूर– मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंडी जिल्ह्यातील राहणारे. राजपूत समाजाचे नेते. पाचव्यांदा आमदार बनले आहेत. 1998 मध्ये सर्वप्रथम निवडून आले होते. आरएसएस आणि अभाविपशी संलग्न राहिलेले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्षही होते.
महेंद्र सिंह ठाकूर – कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मंडीच्या धर्मपूरमधून सलग सातव्यांदा विजयी. दोन वेळा हिमाचल सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत.

किशन कपूर – कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. धर्मशालाचे आमदार आहेत. आधी देन वेळा मंत्री बनले आहेत. पाचव्यांदा आमदार बनले आहेत.

सुरेश भारद्वाज – शिमलामधून आमदार असून चौथ्यावेळी विजयी झाले आहेत. संस्कृतमध्ये घेतली शपथ. भाजपचे बडे ब्राह्मण नेते. लॉ ग्रॅज्युएट आहेत.
अनिल शर्मा – चौथ्यावेळी आमदार बनलेले वीरभद्र सरकारमध्ये मंत्री होते. कांग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. काँग्रेसचे नेचे सुखराम यांचे पुत्र आहेत. सलमानची बहीण अर्पिताचे वडील.
सरवीन चौधरी– चौथ्यावेळी आमदार बनल्या असून आधीही मंत्री होत्या. कांगडा जिल्ह्याच्या शाहपूरमधून आमदार.
रामलाल मार्कंडा – आधीही मंत्री होते. आदिवासी समाजातील नेते. लाहौल स्पितीमधून तिसऱ्यांदा आमदार बनले आहेत.
विपिन सिंह परमार – कांगडाच्या सुहलचे आमदार असून तिसऱ्यांदा विजयी झाले आहे. संघ आणि अभाविपशी संबंधित.
वीरेंद्र कंवर –ऊना जिल्ह्यातील कुटलैहड मतदारसंघातून आमदार बनले. चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संघ आणि अभाविपचे सक्रिय सदस्य.
विक्रम सिंह – हिमाचलमधील राजपूत समाजाचे मोठे नेते.कांगडा जसवा-प्रागपूरमधून विजयी. भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. तिसऱ्यांदा आमदार बनले.
गोविंद सिंह ठाकूर – संस्कृतमध्ये शपथ घेणारे दुसरे मंत्री. मनालीचे आमदार असून तिसऱ्यांदा येथून विजयी झाले आहेत. पहिल्यांदा मंत्री बनले. यांचे वडीलही मंत्री होते.
डॉक्टर राजीव सैजल – तिसऱ्यांदा आमदार बनलेले राजीव सैजल डॉक्टर आहेत. भाजपचे दलित नेते असून सोलन जिल्ह्यातील कसौली मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

हिमाचलचे 13वे मुख्यमंत्री
– जयराम ठाकूर हिमाचल प्रदेशचे 13वे मुख्यमंत्री आहेत. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रेमकुमार धूमल यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवले होते. पण त्यांचा निवडणुकीत पराभव झाला.
– शिमलामध्ये यापूर्वी कधीही कोणत्याही शपथविधी सोहळ्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली नव्हती. पंतप्रधान आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांना आणण्यासाठी 325 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
– सोहळ्याच्या ठिकाणी पोहचण्यासाठी सचिवालयाच्या 252 आणि इतर बोर्ड कॉर्पोरेशन्सच्या 73 गाड्या बोलावण्यात आल्या. मोदी आणि अमित शहांसह इतर 14 जणांचे हेलिकॉप्टर अनाडेलमध्ये उतरले तर 3 चार्टर्ड प्लेन जुब्बडहट्टी एअरपोर्टवर उतरले.