शकुंतलेवर अखेर भारतीय रेल्वेची मोहर

0
23

अमरावती,दि.10 : अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ लोहमार्गावर धावणाऱ्या शकुंतला रेल्वेवर पहिल्यांदाच भारतीय रेल्वेची मोहर लागली आहे. भारतीय रेल्वे (इंडियन रेल्वे) च्या लोगोसह ‘शकुंंतला सवारी गाडी’ असे नाव रेल्वे प्रशासनाकडून डब्यांवर लिहिण्यात आले आहे. यामुळे आता शकुंतला पूर्णत: भारतीय झाली आहे.शकुंतला आधी तीन अंकी क्रमांकाने धावत होती. मूर्तिजापूर-अचलपूर अप गाडीचा क्रमांक १३७, तर अचलपूर-मूर्तिजापूर डाऊन गाडीचा क्रमांक १३८ होता. मूर्तिजापूर-यवतमाळ अप गाडीला १३१, तर यवतमाळ-मूर्तिजापूर डाउन गाडीला १३२ क्रमांक होता. आता या गाड्यांना पाच अंकी क्रमांक देण्यात आला आहे. तीन अंकांच्या समोर ५२ हा आकडा लावण्यात आला आहे.
काल-परवापर्यंत शकुंतलाच्या डब्यांवर नाव नव्हते, भारतीय रेल्वेचा लोगो नव्हता. १९१६ पासून धावत असलेल्या या रेल्वेला स्वत:चे नाव मिळविण्यासाठी २०१८ पर्यंत म्हणजे १०१ वर्षांची वाट पाहावी लागली. शकुंतलाचा रेल्वे मार्ग १८५७ साली अस्तित्वात आलेल्या मेसर्स क्लिक अँन्ड निक्सन लिमिटेड या ब्रिटिश कंपनीची आस्थापना आहे. कंपनीने १९१३ मध्ये सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी लिमिटेडला भारतात एजंट म्हणून नियुक्त केले. पुढे १९१६ ला सेंट्रल प्रॉव्हीन्सेस रेल्वे कंपनी लिमिटेड आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला. करारानुसार अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ हा रेल्वे मार्ग सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी लिमिटेड या खासगी कंपनीच्या मालकीचा आहे. या रेल्वे मार्गावर भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाकडून शकुंतला चालविली जाते. विशेष म्हणजे, हा रेल्वे मार्ग भारतीय रेल्वेच्या मालकीचा नाही. तो केवळ भाडे तत्त्वावर (लीज) आहे .