फेर सर्वेक्षण करुन तालुक्यातील शेतकर्यांना न्याय द्या- जि.प.सदस्य परशुरामकर

0
5

गोंदिया : जिल्ह्यात ९५५ गावे असून यात ३६ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पीक पैसेवारी जिल्हाधिकारी यांनी नुकतीच जाहीर करुन प्रस्ताव शासनाच्या महसूल व वनविभागाला सादर केला. या प्रस्तावात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १४८ गावांची पिक पैसेवारी ही ५० पैश्यापेक्षा वर दाखविण्यात आली आहे. ३०० हेक्टर शेतीही पडीक राहिल्याचे कृषी विभागाचेच आकडे आहेत. त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यावर अंतिम पिक पैसेवारी काढताना अन्याय झाला आहे. त्याचे फेर सर्वेक्षण करुन तालुक्यातील शेतकºयांना न्याय देण्याची मागणी जि.प.सदस्य परशुरामकर यांनी शासनाकडे केली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण थोडेफार चांगले असले तरी तुडतुळा व मावा या कीडरोगांचा सर्वात जास्त प्रकोप अर्जुनी मोरगाव तालुक्यातच झाला. यावर्षी गोंदिया जिल्ह्याला पाऊस अल्प झाल्याने ६२ हजार हेक्टर जमीन पडीक राहीली. या सर्व बाबीचा उहापोह जुलै पासून झालेल्या जि.प.च्या सर्वच स्थायी समितीत व सर्वसाधारण सभेत करुन जिल्हा प्रशासनाला व सरकारला माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण ९५५ गावे असून ३६ गावे रिठी आहेत. त्यात पिक घेतले जात नाही. उर्वरित ९१९ गावांची अंतिम पिक पैसेवारीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्याचे महसूल व वनविभागाला ३० डिसेंबरला सादर केला.
सदर प्रस्ताव शासनाचे ४ मार्च व ३ नोव्हेंबर २०१५ च्या निकषानुसार सादर करण्यात आला. यात ५० पैश्याच्या खालील पिक पैसेवारी असलेली ७७१ गावे व ५० पैश्याच्या वरील पिक पैसेवारीची १४८ गावे असा अहवाल सादर करण्यात आला आहे. ही सर्व गावे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहेत.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात एकूण १५९ गावे असून त्यातील ११ गावे पीक नसलेली आहेत. उर्वरित १४९ गावाची अंतिम पिक पैसेवारी ५० पैश्याचे वर दाखविण्यात आली आहे. वास्तविक या तालुक्यातही सुमारे ३०० हेक्टर जमिनीवर रोवणीच झाली नाही असा कृषी विभागाचा अहवाल आहे. पिक हातात येण्याच्या कालावधीतच पिकांवर मावा व तुडतुळा या कीडरोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. या तालुक्यातील एकही गाव ५० पैश्याच्या आत येऊ नये ही शोकांतिका असल्याचे परशुरामकर यांनी म्हटले आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्याचे सर्वेक्षण करून येथील शेतकºयांना न्याय द्यावा अशी मागणी जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी शासनाकडे केली आहे.