उमरेडमध्ये दारूबंदीसाठी शेकडो महिला एकवटल्या

0
6

उमरेड,दि.23 : शहरात राजरोसपणे सुरू असलेले अवैध दारूचे धंदे बंद झाले पाहिजे, या मागणीसाठी उमरेड उपविभागीय कार्यालयात सोमवारी शेकडो महिला धडकल्या. पार्बता मांढरे यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांनी दारूबंदी झालीच पाहिजे, अशी जोरदार नारेबाजी केली. उपविभागीय अधिकारी जनार्दन लोंढे यांच्याकडे निवेदन सोपविण्यात आले.
शहरात अनेक ठिकाणी अवैध दारूचे धंदे सुरू आहेत. यामुळे असंख्य कुटुंब उद्ध्वस्त होत असून परिसरातील सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेलाही याची झळ सोसावी लागत असल्याची कैफियत यावेळी महिलांनी मांडली. असंख्य बीपीएलधारकांचे धान्य बंद झाले आहे. दुसरीकडे अनेक जण नियमावलीत येत नसूनही बीपीएलच्या यादीत ‘लाभार्थी’ ठरले आहेत. अशीही बाब यावेळी महिलांनी मांडली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जयस्वाल, पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनावर बेबी मराठे, शोभा मराठे, कल्पना मांढरे, रेखा मराठे, दुर्गा मांढरे, वैशाली दलाल, कविता मराठे, देवीदास मराठे, उषा शेगावकर, सुनीता नान्हे, सुमित्रा वाघ, उषा मांढळकर, मनीषा सोनारघरे, कमला मेहरे, अशोक शेगावकर आदींसह अनेक महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलनादरम्यान नगरसेविका पुष्पा कारगावकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे संदीप कांबळे यांची उपस्थिती होती. यासंदर्भात तातडीने पाऊल उचलण्यात आले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पार्बता मांढरे यांनी दिला आहे.