पाथरीची वाटचाल विकासाकडे

0
13

गोंदिया : खा. प्रफुल्ल पटेल यांनी दत्तक घेतलेल्या सांसद आदर्श ग्राम पाथरी येथे रविवारी ८ फेब्रुवारीला अदानी फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर, ग्राम स्वच्छता अभियान व कलापथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. आदर्श ग्राम पाथरी येथे विविध उपक्रम राबवून आदर्शतेच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याने गावात आनंददायी वातावरण दिसून येत आहे.

अध्यक्षस्थानी आ. राजेंद्र जैन होते. अतिथी म्हणून अदानी पॉवर प्लाँटचे सी.पी. शाहू, आॅपरेशन हेड समीर मित्रा, समन्वयक सुबोध सिंग, डीजीएम ए.पी. सिंग, गौरव नायडू, सहायक संजय मिश्रा, विजय नंदनवार, भागेंद्र नायडू उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पाहुण्यांच्या हस्ते ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गावाचा सर्वांगिण विकास साधून सांसद आदर्श ग्राम पाथरीचे नाव देश पातळीवर उंचावू, अशी ग्वाही आ. राजेंद्र जैन यांंनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिली. खा. प्रफुल्ल पटेल यांनी निवड केलेल्या सांसद ग्राम पाथरी गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे अदानी पॉवर प्लांटचे सी.पी. शाहू यांनी सांगितले.

पाथरी गावात लिफ्ट इरिगेशन, शाळेला संरक्षण भिंत, १८ हातपंप, शौचालय, दोन धोबीघाट आदी कामांची खासदार व आमदार फंडातून मंजुरी मिळवून सुरुवात झालेली आहे. शाळेला संगणक संच व इतर कामे अदानी फाऊंडेशनच्या सहकार्याने होत आहेत.

संचालन ग्रामसेवक सी.ए. रहांगडाले तर आभार केवलराम बघेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी सरपंच आशा खांडवाये, उमाकांत चन्ने, पाणलोट व्यवस्थापन अध्यक्ष सचिन बिसेन, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष जियालाल कटरे, मूलचंद खांडवाये, पोलीस पाटील सोमराज बघेले, गोपीचंद भोयर, राजेंद्र राऊत व सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले.