एनएमसी बिलाच्या समर्थनार्थ ५ व ६ फेब्रुवारीला होमिओपॅथी डॉक्टरांची दिल्लीत रॅली

0
6

गडचिरोली,दि.3: होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करण्यासंबंधी लोकसभेने पारित केलेल्या एनएमसी बिलाच्या समर्थनार्थ ५ व ६ फेब्रुवारीला होमिओपॅथी डॉक्टर्स दिल्लीत रॅली काढणार असल्याची माहिती महाराष्ट्र होमिओपॅथी फेडरेशनच्या जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

होमिओपॅथी डॉक्टरांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार दर दीड हजार लोकसंख्येमागे एक एमबीबीएस डॉक्टर असणे गरजेचे आहे. परंतु भारतात असे नाही. येथे सव्वाशे कोटी लोकसंख्येमागे सुमारे १० लाख डॉक्टर्स आहेत. बहुतांश एमबीबीएस डॉक्टर्स जिल्हास्थळी राहून सेवा देतात. मात्र, तालुकास्थळ व ग्रामीण भागात या डॉक्टरांची वाणवा आहे. ग्रामीण जनतेची ही हेळसांड दूर करण्यासाठी संसदेत एनएमसी बिल मांडण्यात आले व लोकसभेने ते पारित केले. या बिलानुसार, होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करुन त्यांच्याकडून सहा महिन्यांचा ब्रीजकोर्स करवून घेण्यात येणार आहे. परंतु एमबीबीएस डॉक्टरांच्या आयएमए संघटनेने या बिलाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे हे बिल राज्यसभेत अजूनही पारित झालेले नाही. होमिओपॅथी डॉक्टरांना शासकीय सेवेत समाविष्ट करुन घेतल्यास ग्रामीण जनतेला नियमित वैद्यकीय सेवा मिळणे सोयीचे होईल. त्यासाठी एनएमसी बिल पारित होणे गरजेचे असून, त्याच्या समर्थनार्थ ५ व ६ फेब्रुवारीला दिल्लीतील रामलिला मैदानावर रॅली काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टर्स त्यात मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती होमिओपॅथी डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला डॉ.सुनील शेंडे, डॉ.विजय म्हस्के, डॉ.आर.डी.मुनघाटे, डॉ.किशोर वैद्य, डॉ.गणेश सातपुते, डॉ.अचिन बिस्वास, डॉ.संदीप भांडेकर, डॉ.वर्षा कापगते, डॉ. मंजुषा लेपसे, डॉ.ओम बन्सोड, डॉ.जगदीश राऊत उपस्थित होते.