कंत्राटी कर्मचारी महासंघाचे भंडारा व गोंदियात आज आंदोलन

0
25

भंडारा/गोंदिया,दि.21ः जिल्ह्यातील २५ विभागातील शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनांच्या महासंघाच्या वतीने भंडारा व गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता.२१) सकाळी १0 वाजता धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ९ फेब्रुवारी २0१८ रोजी शासन निर्णय काढून कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती जास्तीत जास्त तीन कालावधीसाठी करण्याची तथा त्यानंतर पुनर्निवड करण्याची अट घालण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कार्यरत आणि पुढे सुद्धा ज्यांची निवड कंत्राटी कर्मचारी म्हणून होईल, अशा सर्वच कंत्राटी कर्मचार्‍यांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.
त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा,तसेच कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत कायम करावे, अशी मागणी धरणे आंदोलनातून करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण राज्यातील विविध विभागातील सुमारे तीन लाख कंत्राटी कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहे. जिल्ह्यात या आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान,स्वच्छ भारत मिशन, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, पंतप्रधान/मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, उमेद अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जलस्वराज्य, भूजल व सर्व्हेक्षण विकास यंत्रणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बाल र्शमिक विभाग, पाणलोट विभाग, जलयुक्त शिवार, महिला बालविकास विभाग, आत्मा आदी विभागातील कंत्राटी कर्मचारी सहभागी होणार आहेत.