दवनीवाड्याला तालुक्याचा दर्जा द्या

0
4

गोंदिया,दि.23ः- तिरो़डा आणि गोंदिया तालुक्याच्या टोकावर असलेले सर्वात मोठे गाव दवनीवाडा. या गावाला तहसील कार्यालय व पंचायत समिती देवून तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, ही मागणी गेल्या २२ वर्षांपासून केली जात आहे. मात्र आजही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही.त्यातच शासन पातळीवर नव्याने काही जिल्ह्यांच्या निर्मितीचा विषय आल्याने दवनीवाडा तालुका संघर्ष कृती समितीच्यावतीने या मागणीच्या पूर्ततेसाठी तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन दिले आहे. या वेळी सरपंच नरहरप्रसाद मस्करे, राजेश उरकुडे, निरज सोनेवाने, बंठी श्रीबांसुरी, भैयालाल सूर्यवंशी, रोशन चौधरी, शफी शेख, नेहरू उपवंशी, मंडेले व स्वरूप रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.
इंग्रज राजवटीत जनतेच्या सुविधेकरिता ९६ गावांच्या मध्यभागी दवनीवाडा येथे पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिरोडा व गोंदिया तालुक्यांच्या ठिकाणी जनतेला आपले कामे करण्यासाठी त्रास व वेळ अधिक लागत होते. त्यामुळे दवनीवाडा येथे तहसील व पं.स. कार्यालय स्थापित करुन तालुक्याचा दर्जा द्यावा. याकरिता सर्व राजकीय पक्षांचे नामदार, खासदार आणि आमदारांनी पाठिंबा दिला होता.अनेक मुख्यमंत्र्यांनी व इतर मंत्र्यांनी तहसीलचा दर्जा देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
आमदार रहांगडाले यांना दिलेल्या निवेदनात तालुका व पंचायत समिती निर्माण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भंडारा जिल्हा परिषदेच्या सभेत (ठराव क्र. २३ दि.५ नोव्हेंबर १९९६) पहिला ठराव घेण्यात आला होता. पंचायत समिती तिरोड्याच्या सभेत (ठराव क्र. १२ दि. ६ जून १९८५) दुसरा ठराव घेण्यात आला होता. तसेच पंचायत समिती गोंदिया येथे (ठराव क्रमांक १३ दि. ६ सप्टेंबर २००५) तिसरा ठराव घेण्यात आला होता.तिन्ही ठराव सर्वानुमते पारित करुन शासनास देण्यात आले होते. राज्यात नवीन तालुके व पं.स. तयार करताना प्रत्येक वेळी मागणी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, आजही त्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. निवेदनानुसार, महाराष्टÑ शासनाने जिल्हाधिकारी गोंदियामार्फत माहिती व तालुका तयार करण्याकरिता आवश्यक तपशील मागितला. जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती व तपशील पाठविला. तरीपण आजपर्यंत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.