यात्रेदरम्यान भाविकांची गैरसोय टाळावी- – पालकमंत्री बडोले

0
11

गोंदिया,दि.१४: महाशिवरात्रीनिमित्त प्रतापगड येथील यात्रेत येणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन भाविकांची काळजी घ्यावी. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
(ता. १४) अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे १७ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महाशिवरात्री यात्रा आणि ख्वाजा हारुनी उर्सच्या निमित्ताने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा पालकमंत्री बडोले यांनी आयोजित बैठकीत घेतला. यावेळी ते बोलत होते.
सभेला उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, माजी आमदार दयाराम कापगते, जि.प. अर्थ व बांधकाम समिती सभापती प्रकाश गहाणे, पंचायत समिती सभापती तानेश ताराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री पुराम, तहसिलदार संतोष महाले, गटविकास अधिकारी श्री कोरडे, प्रतापगड सरपंच येशूकला कुंभरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, प्रतापगडच्या यात्रेला जिल्हयातून व बाहेर जिल्हयातून लाखो भाविक येतात. यात्रेदरम्यान येणाऱ्या भाविकांना शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध झाले पाहिजे यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे. पाण्याने होणारे आजार यात्रेदरम्यान टाळण्यास मदत होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बंद असलेली पाणीपुरवठा योजना यात्रेपूर्वी सुरु करावी, अन्यथा संबधित अधिकाऱ्याविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल. यात्रेदरम्यान पाणीपूरवठा योजना सुरु झाल्यास भाविकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल.
पहाडावरील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने संबंधित विभागाने दुरस्ती करावी असे सांगून पालकमंत्री बडोले म्हणाले, या रस्त्यामुळे मंदिरापर्यंत भाविकांना लवकर पोहोचण्यास मदत होईल. आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर आणि मेडीक्लोर टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे. भाविकांच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी. ॲम्बूलन्ससेवा तसेच वैद्यकीय पथके यात्रेदरम्यान सक्रीयतेने कार्यरत ठेवावी. स्वाईन फ्ल्युबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
भाविकांना आणणाऱ्या बसेस, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर तसेच दुचाकी वाहनांची पार्कींग व्यवस्था ज्या ठिकाणी करण्यात येईल त्या ठिकाणी पार्कींगचे बोर्ड लावावे असे सांगून पालकमंत्री म्हणाले, यात्रेमध्ये लावण्यात येणारी दुकाने व्यवस्थित ठिकाणी लावण्याबाबत संबधित दुकानदांराना निर्देश द्यावे. तसेच यात्रेदरम्यान परिसर स्वच्छ राहील. याची काळजी घ्यावी. ग्रामपंचायतमार्फत मोबाईल शौचालय तसेच महिलांकरीता मुत्रीघराची व्यवस्था करावी. पहाडावरील मंदिराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
पालकमंत्री बडोले म्हणाले, यात्रेदरम्यान परवानगीशिवाय साऊंड सिस्टिम लावू देवू नये. लाऊडस्पीकरचा आवाज आवश्यक तेवढया डेसीबलमध्ये असावा. त्यामुळे ध्वनीप्रदुषण टाळण्यास मदत होईल. अन्न व औषध प्रशासन विभागाने महाप्रसादाची व भंडाऱ्याची तपासणी करुनच भाविकांना द्यावा. यात्रेदरम्यान दारु पिणाऱ्या व्यक्तीवर पोलिस विभागाने कारवाई करावी. असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, कृषी विभाग आरोग्य विभाग, समाजकल्याण विभाग यांनी आपल्या विभागांच्या विविध योजनांची माहिती भाविकांना व्हावी यासाठी स्टॉल लावावे. यात्रेदरम्यान वीज पुरवठा खंडित होणार नाही याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे.
विविध यंत्रणांनी यात्रेदरम्यान करण्यात येत असलेल्या उपाययोजना व करण्यात येत असलेल्या सोयी सुविधांची माहिती सभेत दिली. सभेला वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री फुलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री हरीश कळमकर, समाजकल्याण सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री लोखंडे, तालुका आरोग्य अधिकारी संजय गुज्जनवार, साकोली एस.टी. आगारप्रमुख, वनविभाग, सिंचनविभाग, पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग तसेच यात्रेसंबधित इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार प्रतापगडचे ग्रामसेवक एल.के. बागडे यांनी मानले.