23.9 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home विदर्भ लांजी, कोईनवर्सी येथील नक्षल चकमकीची होणार दंडाधिकारीय चौकशी

लांजी, कोईनवर्सी येथील नक्षल चकमकीची होणार दंडाधिकारीय चौकशी

0
28

गडचिरोली,दि.27: यंदाच्या जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात एटापल्ली तालुक्यातील लांजी व कोईनवर्सी येथे झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.एटापल्ली तालुक्यातील लांजी येथील जंगलात १० जानेवारी २०१८ ला पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह बंदुकीसह सापडला होता. तसेच गट्टा (जां.) पोलिस मदत केंद्रांतर्गत कोईनवर्सी येथील जंगलात ५ फेब्रुवारी २०१८ रोजी पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाल्याचे पोलिसांनी म्हटले होते. परंतु या चकमकीबाबत शंका व्यक्त करणाऱ्या बातम्या राष्ट्रीय स्तरावरुन प्रकाशित झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या चकमकीची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चकमकीत ठार झालेल्या व्य्क्तीच्या मृत्युच्या कारणांचा शोध घेणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १७६ अन्वये ही दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार आहे.

दोन्ही घटनांची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह एटापल्ली येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रेस नोट प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी केले आहे.लेखी निवेदनात घटनेचे स्वत: पाहिल्याप्रमाणे वर्णन, निवेदन करणाऱ्या व्यक्तीचा उपरोक्त घटनेविषयीचा अनुभव, घटनेनंतर किंवा आधी या घटनेशी संबंधित काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती, घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती यांचा उल्लेख असावा, असे उपविभागीय दंडाधिकारी एस. ए. थेटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे