सत्ता मिळविण्याचा संकल्प संभाजी ब्रिगेड पूर्ण करणार-प्रदेशाध्यक्ष ऍड. मनोज आखरे

0
13
आकाश पडघन
वाशिम दि 27ः-‘ध्यास लोकजागृतीचा… निर्धार परिवर्तनाचा’  हे ब्रीद घेऊन राजकीय सत्ता मिळविण्यासाठी संकल्प बांधत प्रचंड निर्धाराने संभाजी ब्रिगेडच्या स्वराज्य संकल्प अभियान रथयात्रेला जिल्ह्यात सुरवात करण्यात आली. १८ मार्च रोजी शहाजी राजे भोसले यांच्या वेरूळ येथील स्मारक स्थळापासून प्रदेशाध्यक्ष व इतर कार्यकारिणी तसेच सर्व जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत या अभिमानाचा शुभारंभ झाला होता.
त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात येणाऱ्या सर्व निवडणुकांचे रणशिंग या निमित्ताने फुंकले गेले. प्रदेशाध्यक्ष ऍड. मनोज आखरे, पुणे शहर महासचिव सिद्धार्थ कोंढाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  व जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, कार्याध्यक्ष गणेश अढाव, कृष्णा चौधरी, कारंजा- मानोरा विधान सभाध्यक्ष माणिकराव पावडे पाटील, उपाध्यक्ष गणेश सुर्वे, सचिन भालेराव, प्रवक्ता श्रीकांत ठाकरे,  अर्जुन खरात, मंगल गोरे आदींची यावेळी उपस्थिती होती.  यावेळी आगामी काळात महाराष्ट्राची सत्ता संभाजी ब्रिगेड मिळवणारच असल्याचा निर्धार यावेळी बोलताना आखरे यांनी व्यक्त केला.
राजमाता जिजाऊ व शहाजीराजे भोसले यांच्या संकल्पनेतील रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले. सर्व धर्मीय, शेतकरी, आदिवासी, अठरापगड जातसमूहातील मावळ्यांनी यासाठी आपले योगदान दिले. शिवरायांची लोककल्याणकारी विचाराची प्रेरणा या पाठीमागे होती. सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय गुलामगिरी संपवण्यासाठी महामानवांचे विचार मस्तकात घेऊन संघर्ष करणे आवश्यक आहे. संभाजी ब्रिगेड हा लढा सत्तावीस वर्षांपासून लढत आहे. आज शिवरायांच्या भूमीत शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आलीत आहे. लाखो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महिला सुरक्षित नाहीत. युवकांना रोजगार नाही, नोटबंदी, जी.एस.टी, सरकार पुरस्कृत बँक घोटाळे, धार्मिक उन्माद, सरकारी शाळा बंद करणे, या माध्यमातून दहशत निर्माण केली जात आहे. भावनिक प्रश्न ऐरणीवर आणून आमचे हक्क, अधिकार नाकारण्याचे हे षड्यंत्र आहे. स्वातंत्र्यानंतर राजकीय पक्षांनी आलटून- पालटून सत्ता भोगली आहे आणि जनतेला कंगाल केले आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रबोधन करून सत्ता परिवर्तन, घडवून आणण्यासाठी पक्षात सामील होऊन शेठजी, भटजी, लाटजी व बाटजीची सत्ता नेस्तनाबूत  करण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष म्हणून आपल्यासमोर एकमेव पर्याय आहे असे आखरे यांनी यावेळी सांगितले. यावेळी भोयर, अढाव, पावडे, सचिन खंडागळे यांनीही जिल्ह्यातील प्रश्न, राजकीय परिस्थिती, भविष्यात करावयाची वाटचाल, संघटन बांधणी, रथयात्रा अभियान व येणाऱ्या निवडणुका याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी सचिव बबन आरू,  डॉ. दिगंबर निर्गुडे, संतोष इंगोले, मनोज भोयर, अक्षय जगताप, विशाल नायक, राजू कोंघे, ज्ञानेश्वर बेदरे, देवा बर्डे, विकास देशमुख, राहुल बलखंडे, विश्वराज धुळे, वाघजी भालेराव, हनुमान वायचाळ, नयन करहे, वैजनाथ गोरे, धनंजय गोरे, शाम पावडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.