ओबीसी प्रवर्गात कोणत्याही जातींचा समावेश करू नका

0
6

गडचिरोली,दि.04ः-राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या आरक्षणबाबत विभागीय स्तरावर जनसुनावणी घेण्यात येत आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाल्यास भारतीय संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या उद्देशाला हरताळ फासल्या जाईल आणि राज्यातील ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या मागासवर्गीय जाती-जमातींमध्ये असंतोष निर्माण होईल, यामुळे ओबीसी प्रवर्गात मराठा किंवा इतर प्रगत जातींचा समावेश करू नये, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी समाज संघटना तसेच माळी समाज सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून केली.
याबाबत राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग तसेच महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाकडे जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन पाठविल्याचीही माहिती पदाधिकारी दिली.
पत्रकार परिषदेला ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष रमेश मडावी, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर सोनुले, ओबीसी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर गवारे, माळी सेवा संघाचे संयोजक सुनील कावळे, अनिल लेनगुरे, मुखरू मांदाळे, चरण लेनगुरे, माळी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम लेनगुरे, चिंतामण ठाकरे, ओबीसी समाज संघटनेचे जिल्हा सचिव गुरुदेव भोपये, अर्जुन सोमनकर, पी. एस. पेटकूले आदी उपस्थित होते.
११ एप्रिलला मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यात विभागनिहाय जनसुनावणी अयोजित करण्यात येत आहे. येत्या ११ एप्रिल रोजी नागपूर विभागाची जनसुनावणी रविभवन नागपूर येथे आयोजित करण्यात आली असून या जनसुनावणीला ओबीसी प्रवर्गातील सर्व जातीच्या नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.