आईला वाचवण्यासाठी तिने वाघाशी दिली झुंज

0
19

भंडारा,दि.04- वाघाबरोबर झुंज देऊन आपल्या आईचा आणि स्वत: जीव वाचवणा-या साकोली तालुक्यातील उसेगावमध्ये राहणा-या तरुणीवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिमतीच्या बळावर वाघाला पळवून लावलेल्या या तरुणीला आर्थिक मदतीची देखील गरज आहे.कोका- नागझिरा व्याघ्रप्रकल्पाजवळील उसेगावात राहणारी रुपाली मेश्राम (21) ही तरुणी आपल्या आई आणि बहिणीसोबत रहाते. 24 मार्चच्या रात्री घराबाहेर बांधलेल्या शेळ्यांचा आवाज एेकून रुपालीने दरवाजा उघडला.दाराबाहेर आधीच दबा बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. रुपाली पाठोपाठ तिची आईदेखील उठली होती वाघाने तिच्यावरही हल्ला केला.
वाघ आईवर हल्ला करण्याच्या बेतात असताना रुपाली ने त्याचाशी जवळ -जवळ 15 ते 20 मिनटे झुंज दिली. वाघ बघतात चांगल्या चांगल्याची दातखिळी बसते पण रुपाली आपल्या आईला वाचवण्यासाठी वाघाशी निकराने लढली. तिने शेळीचेदेखील प्राण वाचवले. तिचे हे धाडस पाहून वाघ देखील पळून गेला. या झुंजीत रुपालीच्या डोक्याला, हाथापायाला कमरेला दुखापत झाली आहे. तिच्याकडे इलाजासाठी पुरेसे पैसे नाहीत. वनविभागाने देखील तिला कुठलीही आर्थिक मदत अद्याप दिलेली नाही.तिच्या या धाडसाचे मात्र जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र कौतुक केेले जात आहे.