प्रमाणपत्र मिळाले; कर्जमाफी नाही-नाना पटोले

0
7

भंडारा,दि.06ः-छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शासनाने कर्जमुक्तीचा दिलेला शब्द पाळल्याचा दावा करीत १८ ऑक्टोबर २0१७ रोजी जिल्ह्यातील ३२ शेतकरी कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र वितरित करून दिवाळीभेट दिली होती. लाखनी तालुक्यातील रेंगेपार येथील शेतकरी नत्थू कुकसू पिंपळशेंडे या शेतकर्‍यालाही हे प्रमाणपत्र देण्यात आले होते. परंतु, आजपर्यंत त्यांचे नाव ग्रिन लिस्टमध्ये आले नाही. अखेरीस व्याजाचा भुर्दंड बसेल म्हणून सदर शेतकर्‍याने ३१ मार्च रोजी ७३ हजार ९00 रुपयांचे कर्ज भरले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा हा फोलपणा असल्याचा आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी पत्रपरिषदेत केला.
शासनाने केलेली कर्जमाफी कशी धुळफेक आहे. हे दाखविण्यासाठी नाना पटोले यांनी नत्थू पिंपळशेंडे या शेतकर्‍यालाही पत्रपरिषदेत बोलविले होते. नत्थू पिंपळशेंडे यांचा दिवाळीच्या आदल्या दिवशी जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे तिनही आमदार यांच्या उपस्थितीत कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यादिवशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॅन्फरन्सद्वारे शेतकर्‍यांशी संवाद साधला होता. तथापि, पाच महिन्याच्या कालावधीनंतरही पिंपळशेंडे यांचे नाव शासनाच्या ग्रिन लिस्टमध्ये आलेच नाही. त्यामुळे व्याजाचा भुर्दंड बसेल म्हणून त्यांची संपूर्ण कर्ज भरले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मुख्यमंत्र्यानी दिलेली कर्जमाफी धुळफेक असून शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी नाना पटोले यांनी केली.