प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर व व्यवस्थापन कार्यशाळा अदानीत

0
31

गोंदिया दि. ११ः-: अदानी पॉवर महाराष्ट्र लि. तिरोडातर्फे जागतिक पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात आला. या दरम्यान पर्यावरण जागृती व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा पुनर्वापर, महाराष्ट्रातील प्लास्टिक उत्पादन निर्मिती व विक्री तसेच वापरावर बंदी या शासनाच्या अधिसूचनेवर विविध कार्यशाळा घेण्यात आल्या.
भारत जागतिक स्तरावर ‘बील प्लास्टिक पोल्युशन’च्या थीमसह जागतिक पर्यावरण दिन २०१८ चे आतिथ्य करीत आहे. अदानी पॉवरच्या वतीने ग्रामीण विद्यार्थी, कामगार व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात घोषवाक्य व चित्रकला स्पर्धा, पर्यावरणाचे मॉडेल व क्वीज स्पर्धांचा समावेश होता.
प्लास्टिक कचºयाचे पुनर्वापर व व्यवस्थापन या विषयावर जागरूकता कार्यक्रम तिरोडा नगर परिषदेत घेण्यात आला. यात ट्रेडर्स असोसिएशन, नगर परिषद कर्मचारी, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला. जागरूकता सत्रादरम्यान मालेगावमधील वक्ते स्वप्नील कोठारी, देशमुख, सांगलीचे संदीप चव्हाण यांनी प्लास्टिक पुनर्वापर प्रक्रियेबद्दल विविध नवीन तंत्रज्ञान व माहिती दाखविली. तसेच प्लास्टिक कचऱ्यामधून बनविलेल्या विटा व टाईल्सचे प्रदर्शन केले.
अदानी पॉवर महाराष्ट्र लि.तर्फे ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’ चर्चासत्रासाठी निरी नागपूरचे वैज्ञानिक तथा प्रमुख डॉ. अतुल वैद्य यांना वक्ते म्हणून आमंत्रित केले होते. या वेळी गाव प्रतिनिधी सरपंच व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यात डॉ. वैद्य यांनी, कचरा स्त्रोत अलिप्तनाबाबत आपला दृष्टिकोण मांडला. त्यांनी राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी अधिसूचनेनवर सहभागी लोकप्रतिनिधींना माहिती दिली.
समारोपीय कार्यक्रमात प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी जी.एम. तळपाडे, न.प. मुख्याधिकारी विजय देशमुख, स्टेशन हेड सी.पी. शाहू तसेच अदानी समुहाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अदानी पॉवरचे पर्यावरण प्रमुख अरूण प्रतापसिंग यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व व प्लास्टिक कचऱ्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम यावर प्रकाश टाकला. शाहू यांनी, वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण यावर मत व्यक्त केले. तसेच वृक्षारोपणाबाबत भारताची तुलना विकसित देशांशी केली.
मुख्याधिकारी देशमुख यांनी, जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील कचरा वेगळा करण्याच्या पद्धतीचा अवलंब केला तर कचरा व्यवस्थापन समस्येचे नक्कीच निवारण होईल, असे त्यांनी सांगितले. उपविभागीय अधिकारी जी.एम. तळपाडे यांनी घरगुती प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. आभार नितीन शिराळकर यांनी मानले.