मराठ्यांना आरक्षण, तर मुस्लिमांना का नाही?

0
25

नागपूर – मुस्लिम समाज शिक्षण, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात मागे आहे. आजही ग्रामीण भागातील 80 टक्के मुस्लिम कच्च्या घरात राहतात. 65 वर्षांपासून आम्ही या असामाजिक वादळाचा सामना करीत आलो आहोत. महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देणारे विधेयक आणले जाते; परंतु मुस्लिमांना आरक्षणापासून वंचित ठेवले जाते. मराठ्यांना आरक्षण, तर मुस्लिमांना का नाही? त्यांनी या सरकारचे काय बिघडविले? देवेंद्र फडणवीस सरकार मुस्लिमविरोधी आहे का, असा सवाल ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी येथे केला.

उत्तर नागपुरातील बुद्धपार्क येथे जाहीर सभेत ओवेसी बोलत होते. ते म्हणाले, “मी मराठा आरक्षणाचा विरोध करीत नाही; परंतु सच्चर समितीने दिलेल्या अहवालात स्पष्टपणे मुस्लिमांना आरक्षण देण्याचे म्हटले असताना फडणवीस सरकारने सब ऑर्डिनन्स विधानसभेत आणले नाही. मुस्लिम समाज केवळ 28 टक्के शिक्षित आहे. मुख्यमंत्री फडणवीस सांगा तुम्ही, मुस्लिमांसोबत तुमचा हाच न्याय आहे काय? याच कारणांमुळे माझ्या वाणीतून निघालेल्या आक्रमक शब्दांमुळे तुमची रात्रीची झोपमोड होत असेल. महमूद ऊर रहमान समितीच्या अहवालात ही संपूर्ण आकडेवारी आहे.‘

‘मुस्लिम आपल्या मुलांना आयएएस, आयपीएस, इंजिनिअर, मोठे अधिकारी होण्याची स्वप्ने पाहू शकत नाहीत का? केवळ दोन टक्के या समाजातील लोक आयएएस झालेले आहेत. संविधानानुसार कोणताही समाज शिक्षणात मागे असेल तर त्याला आरक्षण दिले पाहिजे, असे म्हटले आहे. तरीही फडणवीस सरकार मुस्लिमांना आरक्षणापासून वंचित ठेवते,‘ असा आरोप ओवेसींनी केला.

पंतप्रधान मोदींवर डागली तोफ
ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही तोफ डागली. ते म्हणाले, “सबका साथ, सबका विकास‘ हे मोदी सरकारचे घोषवाक्‍य असेल तर महाराष्ट्रात हे विचार का लागू होत नाही? दलितांवर अत्याचार करणारे हे सरकार आहे काय? अच्छे दिन गेले कुठे?